- संजय शर्मा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जानेवारी रोजी ५० लाख नवीन मतदार आणि तरुणांशी ऑनलाइन संवाद साधतील. देशातील तरुण आणि नवीन मतदारांना भाजपशी जोडण्यासाठी देशभरात नवीन मतदार संमेलनाचे आयोजन करणार आहे.
‘अब की बार ४०० पार’ या नव्या घोषणेसह भाजप निवडणूक लढविणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेल्या युवक, महिला, शेतकरी आणि गरीब या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. त्यातील सर्वांत महत्त्वाचा घटक तरुणांवर जास्तीतजास्त लक्ष केंद्रित केले जात आहे. २५ जानेवारी रोजी नरेंद्र मोदी देशातील ५० लाख नवीन मतदारांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. त्यानंतर देशभरात नवीन मतदार संमेलन आयोजित करणार आहे.
नेतेही राहणार उपस्थितभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी भाजप मुख्यालयात भाजप युवा मोर्चा कार्यक्रमात नवीन मतदार संमेलनाचे उद्घाटन केले.देशभरातील नवीन मतदार आणि तरुणांना भाजपशी जोडण्याचे निर्देश दिले. भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनाही या नवमतदार संमेलनांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
२९ रोजी पंतप्रधान करणार ‘परीक्षा पे चर्चा’ देशातील दोन कोटींहून अधिक तरुणांना भाजपशी जोडून मतांची टक्केवारी वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ जानेवारीला विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ करणार आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थी आणि तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय कार्यक्रम बनला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी केंद्र सरकारचे शिक्षण मंत्रालय सांभाळते. विद्यार्थ्यांसोबत झालेल्या आजवरच्या संवाद कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यात विद्यार्थ्यांनीही मोदी यांना मनमोकळेपणाने अनेक प्रश्न विचारले.