- सुरेश भुसारीलाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या हुसैनीवाला येथील शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या वाहनांचा ताफा बुधवारी दुपारी एका फ्लायओव्हरवर शेतकऱ्यांनी अडविला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. यानंतर माेदी पंजाबचा दाैरा अर्धवट साेडून भटिंडा येथून विमानाने दिल्लीला रवाना झाले. याप्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली असून सुरक्षा यंत्रणेतील गंभीर उल्लंघन व केलेल्या ढिसाळपणाबद्दल पंजाब सरकारला खुलासा मागितला आहे.
पंतप्रधान माेदी यांच्या हस्ते पंजाबमध्ये बुधवारी जवळपास ४२,७५० कोटी रूपयांच्या अनेक विकासकामांचे भूमिपूजन हाेणार हाेते. या संदर्भात त्यांनी सकाळी ट्विटही केले. मोदी यांची फिराेजपूर येथे जाहीरसभा हाेती. परंतु, खराब हवामानामुळे ती रद्द करण्यात आली. यामुळे त्यांनी हुसैनीवाला येथे असलेल्या शहीद स्मारकाला भेट देण्याचे ठरविले. ही भेट हेलिकाॅप्टरने होणार हाेती. जवळपास १५ ते २० मिनिटे वाट पाहिल्यानंतर ही हवामान चांगले न झाल्याने हेलिकाॅप्टरने तेथे जाणे रद्द करावे लागले. यामुळे वाहनांनी हुसैनीवाला येथे जाण्याचे ठरविण्यात आले.
सुरक्षेची चाेख व्यवस्था झाल्यानंतर पंतप्रधानांचा ताफा हुसैनीवालाकडे रवाना झाला. याबद्दलची माहिती पंजाबचे पाेलीस महासंचालकांना सुद्धा हाेती. हुसैनीवाला शहीद स्मारक ३० किलाेमीटर अंतरावर असताना एका फ्लायओव्हरवर पंतप्रधानांच्या वाहनांचा ताफा पाेहाेचल्यानंतर अचानकपणे शेतकऱ्यांनी रस्ता अडविला. जवळपास १५ ते २० मिनिटे पंतप्रधानांचा ताफा अडविण्यात आला. हुसैनीवाला येथे जाणे रद्द करून पंतप्रधानांचा ताफा भटिंडा येथे परत फिरला. भटिंडा येथून विमानाने पंतप्रधान दिल्लीला रवाना झाले.पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये झालेल्या ढिसाळपणाची गंभीर दखल तत्काळ केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली आहे.
मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला खेदफिरोजफूर दौरा अर्धवट सोडून पंतप्रधानांना परत जावे लागले याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी खेद व्यक्त केला आहे. पंतप्रधानांच्या जाण्याच्या मार्ग ऐनवेळी बदलण्यात आल्याबद्दल कोणतीही सूचना राज्य सरकारला मिळाली नव्हती, असे स्पष्ट करीत चन्नी यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपाचा साफ इन्कार केला आहे.
जबाबदारी निश्चित कराकेंद्रीय गृहमंत्रालयाने निवेदन जारी करून पंतप्रधानांच्या सुरक्षामध्ये झालेले उल्लंघन, निष्काळजीपणा व ढिसाळपणाबद्दल अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश पंजाब सरकारला दिले आहेत. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत गंभीर निष्काळजीपणाबद्दल पंजाब सरकारने सविस्तर खुलासा करावा, असेही या निर्देशांकमध्ये म्हटले आहे.