- संजय शर्मानवी दिल्ली - तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी करण्याचा पहिला आदेश दिला. सायंकाळीच मंत्रिमंडळाची बैठक बोलावून प्रधानमंत्री आवास योजनेचे बजेट वाढवून तीन कोटी नवीन घरे देण्यास मंजुरी देण्यात आली.
मोदी सरकार ३.० च्या शपथविधीसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्याच दिवसापासून पूर्ण ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. पहिल्याच दिवशी पंतप्रधानांनी किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी करण्यासाठी फाइलवर स्वाक्षरी केली. पंतप्रधानांच्या स्वाक्षरीनंतर ९.३ कोटी शेतकऱ्यांच्या किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. किसान सन्मान निधीचा हा १७ वा हप्ता असेल. ९.३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात अंदाजे २० हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले जातील. शेतकऱ्यांचे जीवन सुकर करण्यासाठी वचनबद्ध आहोत, असे मोदींनी स्वाक्षरी केल्यानंतर म्हटले.
गरिबांना कायमस्वरूपी घरेसायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून प्रधानमंत्री आवास योजनेचे बजेट वाढवून तीन कोटी गरिबांना कायमस्वरूपी घरे देण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. मोदी सरकार ३.० ची ही पहिलीच कॅबिनेट बैठक होती.
आमचे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणारमोदींनी शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. रब्बी आणि खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीतही मोदी सरकार सातत्याने वाढ करत आहे. किसान सन्मान निधीचे प्रत्येकी २,००० रुपयांचे तीन हप्ते दरवर्षी शेतकऱ्यांना दिले जात आहेत. त्यावर केंद्र सरकार ६ हजार कोटी रुपये खर्च करत आहे.
राष्ट्रपतींना संसदेचे अधिवेशन बोलावण्याची विनंतीमोदी मंत्रिमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसदेचे अधिवेशन बोलावण्याची विनंती केली आहे. १८ जूनपासून संसदेचे अधिवेशन बोलावणे, १८ आणि १९ जून रोजी खासदारांचा शपथविधी आणि २० जून रोजी नवीन लोकसभा अध्यक्षांसाठी निवडणूक घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सरकारने म्हटले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २१ जून रोजी संसदेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करू शकतात.