नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी आभासी जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद घेणार आहेत. या परिषदेत ते आघाडीच्या व सार्वभौम संपत्ती निधी संस्था आणि देशांतर्गत व्यावसायिक नेते यांच्याशी चर्चा करणार आहेत.वित्तमंत्री निर्मला सीतारामन, वित्तीय क्षेत्रातील नियामक आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांचीही बैठकीला उपस्थिती राहणार आहे. जगातील २० आघाडीच्या निवृत्तिवेतन व सार्वभौम संपत्ती निधी संस्थांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार आहेत. या संस्था ६ लाख कोटी डॉलरपेक्षा जास्त संपत्तीचे व्यवस्थापन करतात. भारतातील अनेक बडे उद्योगपतीही बैठकीला हजेरी लावणार आहेत. रतन टाटा, मुकेश अंबानी, दीपक पारेख, नंदन नीलेकणी, उदय कोटक आणि दिलीप शांघवी यांचा त्यात समावेश आहे. सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, भारतीय अर्थव्यवस्था आणि गुंतवणूक परिदृश्य यावर चर्चा केली जाणार आहे.
पंतप्रधानांची आज जागतिक गुंतवणूक गोलमेज परिषद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2020 7:07 AM