ऑनलाइन लोकमत -
उत्तरप्रदेश, दि. ३ - वडिलांच्या आजारपणामुळे घरची आर्थिक परिस्थिती खालावत चालल्याने कानपूरमधील दोन मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मदतीच पत्र पाठवलं होत. पंतप्रधान कार्यालयाने देखील या पत्राची दखल घेत मुलांना मदतीचे आदेश दिले आहेत. मुलांचे वडील सरोज मिश्रा यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्याची हमी पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
कानपूरमधील सुशांत मिश्रा आणि तन्मय मिश्रा या भावांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे पत्र पाठवलं होतं. सुशांत आणि तन्मयचे वडील 2 वर्षापासून अस्थमाच्या आजाराने त्रस्त आहेत. ज्यामुळे गेले 6 महिने ते अंथरुणाला खिळून बसले आहेत. त्यांना त्यांचा टेलरिंगचा व्यवसायही करायला जमत नाही आहे. वडिलांच्या आजारामुळे घरातली आर्थिक परिस्थिती बिघडत चालली आहे त्यात शाळेची फी भरायलाही पैसे नसल्यामुळे सुशांत आणि तन्मयने शाळेत जाणंही बंद केलं होतं. घराचं भाड तर गेले कित्येक महिने दिलेलं नाही.
सुशांत मिश्रा आणि तन्मय मिश्रा यांनी अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच पत्र लिहून मदतीची मागणी केली. पंतप्रधान कार्यालयाने या पत्राची दखल घेत कानपूरच्या जिल्हा दंडाधिकारी आणि मेडिकल ऑफिसर यांना सरोज मिश्रा यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यास सांगितले आहे.