संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या विरोधात संसदेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पुढील आठवड्यात चर्चा होऊ शकते. ७ फेब्रुवारी २०१९ रोजी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत म्हटले होते की, विरोधक २०२३मध्येही त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणतील. पंतप्रधानांनी चार वर्षांपूर्वी संसदेत दिलेले निवेदन खरे ठरले आहे.
या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी निश्चित होण्याची शक्यता आहे. २७ व २८ जुलै रोजी दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानच्या सीकरमध्ये व गुजरातच्या राजकोटच्या दौऱ्यावर जात आहेत; तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २८ रोजी रामेश्वरममध्ये व २९ रोजी तेलंगणामध्ये जाणार आहेत.
पुढील सोमवारी, ३१ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दिल्ली अध्यादेश विधेयक लोकसभेत सादर करणार आहेत. त्यानंतर अविश्वास प्रस्तावावर चर्चेसाठी दिवस निश्चित होऊ शकेल. प्रस्तावापूर्वी सरकार आपले सर्व कामकाज पूर्ण करून घेऊ इच्छिते. अविश्वास प्रस्तावानंतर विरोधी पक्ष पुन्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने संसदेत अडथळा निर्माण करू शकतात.