'पंतप्रधानांचे शब्द आणि कृती जुळत नाही'; राहुल गांधींचचा नरेंद्र मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 04:45 PM2022-08-28T16:45:09+5:302022-08-28T16:45:53+5:30
'राष्ट्रासाठी खादी आणि राष्ट्रध्वजासाठी चीनचे पॉलिस्टर'
नवी दिल्ली: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर टीका करत असतात. आता मोदींनी खादीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राहुल यांनी रविवारी ट्विटच्या माध्यमातून नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
गुजरातमधील साबरमती नदीच्या किनारी खादी महोत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हटले होते की, 'स्वातंत्र्यानंतर खादीकडे दुर्लक्ष झाले होते, पण आता हेच खादी स्वावलंबी भारतासाठी प्रेरणास्त्रोत बनत आहे. खादी जशी स्वातंत्र्याची प्रेरणा बनली, त्याचप्रमाणे ती स्वावलंबी भारतासाठीही मोठी प्रेरणा बनू शकते.'
‘Khadi for Nation’ but Chinese Polyester for National flag! 🇮🇳
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 28, 2022
As always, the words and actions of the PM never match.
राहुल गांधींची टीका
मोदींच्या खादीवरील वक्तव्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, 'पंतप्रधानांच्या बोलण्यात आणि वागण्यात मेळ नसतो. राष्ट्रासाठी खादी, पण राष्ट्रध्वजासाठी चीनचे पॉलिस्टर', असे ट्विट राहुल यांनी केले. यापूर्वी 10 ऑगस्ट रोजी राहुल यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधत फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रध्वज खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. भाजप राष्ट्रवाद विकत असून गरिबांचा स्वाभिमान दुखावत असल्याचा आरोप राहुल यांनी केला होता.
पेगासस प्रकरणावरही टोमणा
पेगासस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात नुकत्याच झालेल्या सुनावणीनंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले होते की, 'पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारने चौकशीसाठी नेमलेल्या समितीला मदत न करणे, यातून स्पष्ट होते की त्यांच्याकडे काहीतरी लपविण्यासारखे आहे. हे सरकारला लोकशाही चिरडण्याचे काम करत आहे'.