नवी दिल्ली : पंतप्रधानपदासाठी आपण ना दावेदार आहोत ना इच्छुक, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपविरुद्ध सर्व विरोधी पक्षांना एकजूट करणे हाच आपला उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत त्यांनी चर्चा केली. माकपच्या कार्यालयात पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि भाकपचे सरचिटणीस डी. राजा यांच्याशी चर्चा केल्यानंतर नितीशकुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, डावे पक्ष, काँग्रेस आणि सर्व प्रादेशिक पक्ष यांना एकजूट करण्याची ही वेळ आहे. येचुरी म्हणाले की, नितीशकुमार यांचे विरोधी गटात परत येणे आणि भाजपविरुद्ध लढाईचा एक भाग बनण्याची त्यांची इच्छा हे देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे बदल आहेत.
नितीशकुमार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात ९० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर केजरीवाल यांनी ट्विट केले की, माझ्या घरी आल्याबद्दल मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे धन्यवाद. भाजपतर्फे होत असलेल्या आमदार खरेदी, विरोधी पक्षांची राज्य सरकारे पाडण्यासाठी राबविण्यात येत असलेले ऑपरेशन लोटस या केंद्र सरकारच्या धोरणावर चर्चा झाल्याचे केजरीवाल म्हणाले.
दिल्लीत भेटीगाठी भाजपसोबत वेगळे झाल्यानंतर नितीशकुमार हे प्रथमच सोमवारी दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, जनता दल सेक्युलरचे प्रमुख एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी चर्चा केली. सपाचे संस्थापक मुलायमसिंह यादव, भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे ओम प्रकाश चौटाला, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांसोबत ते चर्चा करण्याची शक्यता आहे.