- प्रमोद गवळी, नवी दिल्लीजगातील सर्वाधिक स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणण्याचा दावा करणाऱ्या कंपनी ‘रिंगिंग बेल्स’च्या कार्यालयावर उत्पादन शुल्क आणि आयकर विभागाने छापा घालून काही दस्ताऐवज जप्त केला. कंपनीने २५१ रुपयांत स्मार्टफोनची विक्री करण्याची घोषणा केल्यानंतर या विभागांची वक्रदृष्टी कंपनीकडे वळली आहे. नोएडास्थित कंपनीच्या अर्थव्यवस्थेची सखोल पडताळणी करीत आहे. कंपनीचे अध्यक्ष अशोक चढ्ढा यांनीसुद्धा उत्पादन शुल्क आणि आयकर विभागाचे अधिकारी कंपनीत चौकशीसाठी आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मेक इन इंडिया, कुशल भारत आणि स्टार्ट अप इंडिया या योजनेंतर्गत भारताचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत, असे आपण अधिकाऱ्यांना सांगितले. यासंदर्भात उत्पादन शुल्क आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला काही दिशानिर्देश दिले आणि भविष्यात संपूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली, असे चढ्ढा म्हणाले.‘फ्रीडम’ची बुकिंग बंदकेवळ २५१ रुपयांत ‘फ्रीडम-२५१’ हा स्मार्टफोन तयार करण्याची घोषणा करणाऱ्या नोएडास्थित एका कंपनीने बुकिंग बंद केले असून पहिल्या टप्प्यात २५ लाख स्मार्टफोन देण्याची घोषणा केली आहे.कंपनीने शुक्रवारी पाच कोटी स्मार्टफोनची नोंदणी झाल्याचे जाहीर केले होते. आता मात्र कंपनीने २५ लाखांचे उद्दिष्ट असून ते पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीकडे ७३ कोटी रुपयांची रक्कम अदा झाली आहे. विशेष म्हणजे कंपनीने अजून स्मार्टफोनचे उत्पादन सुरू केलेले नाही.
‘फ्रीडम २५१ च्या’ कार्यालयावर छापा
By admin | Published: February 21, 2016 1:03 AM