नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांचं संसदेतील भाषण चर्चेचा विषय बनलं आहे. कोरोना विषयावरील चर्चासत्रात खासदार कोल्हेंनी तुफान फटकेबाजी करताना मोदी सरकारला लक्ष्य केले. तर, राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाचे कौतुकही केले. ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काय तयारी केली आहे, असा सवालही कोल्हेंनी लोकसभेत विचारला.
अमोल कोल्हेंनी भाषणाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदींचा फोटो छापून येतो, त्यावरुन कोल्हेंनी मोदी सरकारला टोला लगावला. "अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो, पराजय का बोझ भी स्वीकारना होगा", असे म्हणत कोरोनामुळे देशात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचीही जबाबदारी स्वीकारयला हवी, असे कोल्हेंनी म्हटले. दरम्यान, सिरम इन्स्टिट्युटच्या म्हणण्यानुसार जगभरात अनेक देशांनी कोविशिल्डच्या बुस्टर डोसची शिफारस केली असताना केंद्रसरकारने याबाबत काय विचार केला आहे काय? तसेच दोन्ही डोसमधले अंतर कमी करुन लसीकरण वाढवता येवू शकेल का? त्याचप्रमाणे लहान मुलांच्या लसीकरणाची काय स्थिती आहे? या प्रश्नांची सरबत्तीच कोल्हेंनी केली.
कोविड काळात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व प्रशासकीय अधिकारी यांनी राज्यात चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळून नियंत्रण प्रस्थापित केल्याचे कोल्हे यांनी ससंदेत सांगितले. तर, कोरोनामुळे बळी पडलेल्या माता-पित्यांच्या अनाथ मुलांसाठी लोकसभेतील गटनेत्या सुप्रिया सुळे यांच्या कल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या 'राष्ट्रवादी जीवलग' अभियानाची माहिती देत हे अभियान देशभर राबविण्याची मागणीही त्यांनी केली. दुसऱ्या बाजूला बँकांनीही ईएमआयमध्ये सवलत दिली नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. आपल्या भाषणाच्या शेवटी डॉ. कोल्हेंनी मोदींना उद्देशून कवितेच्या माध्यमातून टोला लगावला.
"अगर जीत का सेहरा बंधवाना हो तो,पराजय का बोझ भी स्वीकारना होगा"'जर लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो छापायचा असेल तर मृत्यू प्रमाणपत्राची जबाबदारी पण घ्यायला हवी', असे कोल्हेंनी म्हटले.