नवी दिल्ली- नोटाबंदी लागू केल्याच्या निर्णयाला 8 नोव्हेंबर 2017ला एक वर्ष पूर्ण होणार आहे. नोटाबंदीवरून विरोधकांनी भाजपा सरकारवर वारंवार टीका केली असताना केंद्र सरकारनंही कायम नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन केलंय. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या निवडणुकीतील भाजपाला मिळालेल्या विजयानंतर तर सत्ताधा-यांनी विरोधकांनाही चुकीचं सिद्ध केलं होतं. 2 हजारांच्या नव्या नोटांवरून विरोधकांनी भाजपा सरकारला वारंवार लक्ष्य केलं होतं. तसेच भाजपानंही त्याला वारंवार चोख प्रत्युत्तर दिलं होतं. भारतीय चलनात 2 हजाराच्या नोटेचा समावेश झाल्यानंतर महिन्याभरातच रा.स्व. संघाचे विचारक एस. गुरूमूर्तींनी जाहीरपणे निवेदन केले की जे लोक 2 हजारांच्या नोटा साठवून ठेवू इच्छितात, त्यांनी आताच त्याचा पुन:र्विचार केलेला बरा, याचे कारण 2 हजारांची नोट अधिक काळ चलनात राहिल, याची अजिबात शक्यता नाही.एप्रिल महिन्यात राज्यसभेत सरकारने उत्तर दिले की २ हजाराच्या नोटेचे निश्चलनीकरण करण्याची सरकारची कोणतीही योजना नाही. पत्रकारांनी अर्थमंत्री अरूण जेटलींना आॅगस्ट महिन्यात विचारले की २ हजारांची नोट टप्प्या टप्प्याने चलनातून बाद करण्याचा सरकारचा इरादा आहे काय? त्यावर जेटलींनी नि:संदिग्ध शब्दात उत्तर दिले की, असा कोणताही विचार सरकारच्या मनात नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंही 2000 रुपयांच्या नोटांची मर्यादित छपाई करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळेच 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली आहे. लाइव्ह मिंटनं दिलेल्या वृत्तानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंही 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली असून, यंदाच्या आर्थिक वर्षात त्या छापण्यात येणार नाहीत. 2 हजार रुपयांच्या नोटांवरून सरकारकडूनही वेळोवेळी स्पष्टीकरण दिलं जात आहे. तसेच 2 हजार रुपयांच्या नोटांच्या विमुद्रीकरणाची कोणतीही योजना नाही, असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं होतं. इंडिया टुडे नेटवर्कच्या वृत्तानुसार, आरटीआय कार्यकर्त्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे माहिती अधिकारांतर्गत 2 हजार रुपयांच्या छपाईसंदर्भात माहिती मागवली होती. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL)कडून मिळालेल्या माहितीनुसार, 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई करण्यासाठी आरबीआयकडून कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत आम्ही फक्त 500 रुपयांच्या नोटा छापत आहोत, असंही SPMCILनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे SPMCIL 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई करत नसल्याचं उघड झालं आहे.
2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंदावस्थेत, आरटीआयमधून झालं उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 4:56 PM