अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमीत भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. त्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जय्यत तयारी असून बाजारापेठाही फुलल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशावीसीयांना २२ जानेवारी रोजी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं असून नागरिकांमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. बाजारात राम मंदिर, अयोध्या आणि तत्सम गोष्टींशी निगडीत वस्तूंची जोरकसपणे खरेदी सुरू आहे. त्यामुळेच, सुरतमध्ये प्रभू श्रीराम आणि राम मंदिर यांचे छायाचित्र असलेल्या साड्या प्रिंट करण्यात आल्या आहेत.
आशियातील सर्वात मोठा कपडा बाजार सूरतमध्ये आहे, याच सूरतमधील फॅक्टरीत तयार होणाऱ्या साड्यांवरही अयोध्येतील २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची झलक पाहायला मिळत आहे. येथील व्यापाऱ्यांकडून अयोध्येसह देशभरातील अनेक राम मंदिरात विराजमान असलेल्या माता जानकी यांच्यासाठी मोफत साडी पाठविण्यात येणार आहे. साड्यांचं शहर समजलं जाणाऱ्या सूरतमध्ये यापूर्वीही अनेकदा देशातील विविध मुद्द्यांना अनुसरून साड्यांचे प्रिटींग झालं आहे. यंदा अयोध्येतील राम मंदिराची डिझाईन असलेल्या साड्या प्रिंट केल्या जात आहेत.
सूरतमधील कपडा फॅक्टरीत या साड्या बनवण्याचं काम जोरकसपणे सुरू आहे. त्यामुळे, लवकरच या साड्या अयोध्या नगरीत विक्रीसाठीही उपलब्ध होतील. फॅक्टरीचे मालक ललित शर्मा यांनी म्हटले की, अयोध्येतील राम मंदिराचा देशभरात आणि जगभऱातील भारतीय नागरिकांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे, रामभक्तांच्या भावनांचा आदर करत आणि या उत्सवात सहभागी होण्याच्या निमित्ताने आमच्याकडून साडीच्या माध्यमातून योगदान दिलं जात असल्याचं शर्मा यांनी म्हटलं.
देशभरात ५० हजार कोटींची उलाढाल
श्री राम मंदिराच्या उद्घाटनदिवशी देशभरात ५०,००० कोटी रुपयांपेक्षा मोठी उलाढाल होण्याचा अंदाज आहे. व्यापारी संघटना असलेल्या कनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (CAIT) अंदाजानुसार २२ जानेवारी रोजी देशभरात ५० हजार कोटी रुपयांचा व्यापार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी, व्यापाऱ्यांनीही कंबर कसली असून गरजेनुसार वस्तू आणि सामानांची खरेदी-विक्री सुरू केली आहे.