नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे अनेक अडचणींना तोंड देत असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक साह्य देण्यास माझे प्राधान्य असेल, असे केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांच्याशी येथे सोमवारी झालेल्या भेटीत राणे म्हणाले की, छोट्या व्यापाऱ्यांना कोविड-१९ च्या दिवसांत मोठा तोटा सहन करावा लागला आणि त्यांना आवश्यक ते आर्थिक साह्य देऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे मंत्रालय प्राधान्य देईल. महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी मी काम करीत असून या उद्देशासाठी आवश्यक ती तरतूद अर्थसंकल्पात करावी यासाठी सरकारकडे बाजू माडंली आहे, असेही नारायण राणे म्हणाले. आमच्या खात्याच्या जीडीपीचा किती भाग महत्त्वाच्या विभागांना वाटून दिलेला आहे याची माहिती मी माझ्या विभागाला विचारली असून त्या आधारावर भविष्यातील धोरणे ठरवीन, असे राणे म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपी विमानतळाचा उल्लेख करून राणे म्हणाले की, तेथील धावपट्टी ही मूळ योजनेपेक्षा लहान झाली असून ती विस्तारित कशी करता येईल, हे मी बघेन.पर्यटनाला चालनासमुद्राच्या किनाऱ्यावर साचलेल्या बॅकवॉटरला ते जेटी म्हणून वापरतील. त्यामुळे लोक गोवा आणि रत्नागिरीला जाऊ शकतील व त्यातून पर्यटनाला, स्थानिक व्यवसायाला चालना मिळेल आणि तेथे मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होतील, असेही राणे म्हणाले.
छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक साह्य देण्यास प्राधान्य- केंद्रीय मंत्री नारायण राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 6:26 AM