जोधपूर : बलात्काराच्या आरोपावरून स्वयंभू आध्यात्मिक गुरू आसाराम बापू सध्या तुरुंगात असले तरी राजस्थानातील तिसरीच्या पाठ्यपुस्तकात मात्र आसाराम बापंूना स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा आणि रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या महान संतांच्या पंक्तीत बसविण्यात आले आहे. राजस्थानातील जोधपूर जिल्ह्याच्या अनेक शाळांमध्ये ‘नया उजाला’ नामक मूल्य शिक्षण आणि सामान्यज्ञानाचे पुस्तक विद्यार्थ्यांना अभ्यासात आहे. या पुस्तकात आसाराम बापू हे स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा आणि रामकृष्ण परमहंस यांच्यासारखे महान संत असल्याचे सांगत त्यांचे छायाचित्रही प्रकाशित करण्यात आले आहे. योगगुरु रामदेवबाबा यांचे नावही या महान संतांच्या यादीत आहे.दिल्लीतील गुरुकुल एज्युकेशन बुक्स या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात महान संतांच्या यादीत आसाराम यांचे नाव पाहून अनेकांनी आक्षेप नोंदवला. याबाबत प्रकाशन संस्थेला विचारले असता, पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा आसाराम बापूविरूद्ध कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता, असे त्यांनी सांगितले. राज्य शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी याबाबत अद्याप माहिती नसल्याचे सांगितले. मात्र हे पुस्तक ज्या शाळांमध्ये शिकवले जात आहे, तेथील संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस जारी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.आसाराम बापू यांना एका बलात्कारप्रकरण आगस्ट २०१३ मध्ये अटक करण्यात आली होती. एका १६ वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या ते जोधपूरच्या तुरुंगात बंद आहेत. (वृत्तसंस्था)————————————-कोटआम्ही हे पाठ्यपुस्तक बाजारातून परत बोलवत असून आसाराम यांचे नाव हटवून या पुस्तकाची नवी आवृत्ती विद्यार्थ्यांना उपलब्ध करू दिली जात आहे.-प्रवक्ता, गुरुकुल एज्यु. बूक्स, दिल्ली
तुरुंगातील आसारामबापू महान संतांच्या पंक्तीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2015 2:32 AM