ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - उत्तर प्रदेशमधील अटॉप कारागृहात कैद्यांनी पोलिसांवर हल्ला करत चक्क जेलचा ताबा घेतला आहे. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यावरही हल्ला चढवला होता. फतेहगड जिल्हा अटॉप कारागृहातील कैद्यांनी सकाळी 11 वाजेपासून सुरक्षा रक्षकांना ओलीस ठेऊन कारागृहावर ताबा मिळवला आहे.
कैद्यांनी घातलेल्या हैदासात कारागृहातील बराकीचे नुकसान झाले आहे. कैद्यांनी बराकी पेटवून तर दिल्याच शिवाय कारागृहाच्या छतावर चढून दगडफेकही करत आहेत. त्यामुळे कारागृहातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र आहे.
कारागृहाच्या दुसऱ्या गेटमधून आत शिरण्यासाठी अधिकारी व पोलीस कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अतुल नावाच्या एका कैद्यामुळे हा हिंसाचार भडकल्याची प्राथमिक माहिती आहे. कंबरदुखीमुळे हा कैदी रुग्णालयात दाखल होता. त्याला कालच डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर आज सकाळी त्याची बराकीमध्ये रवानगी करण्यात आली.
दरम्यान, त्याला बराकीत नेत असतानाच त्याने सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे लगेचच कारागृहाचा अलार्म वाजला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. कारागृहात तैनात अधिकारी व कर्मचारी कैद्यांना शांतता राखण्याचं आवाहन करत होते मात्र त्याला न जुमानता अनेक कैदी बराकींच्या छतावर चढले आणि त्यांनी दगडफेक सुरू केली. त्यानंतर अधिक हिंसक होत कैद्यांनी कारागृहातील चादरी, गाद्या पेटवून दिल्या. कैद्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत असताना डोक्याला दगड लागून कारागृह अधीक्षक आर. के. वर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत.