नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून सुरू झालेला कोरोनाचा कहर अद्यापह शमताना दिसत नाही. आता तर दुसरी लाट अधिक तीव्र आणि संहारक असल्याचे पाहायला मिळत आहे. कारागृहातील कैद्यांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये. कैद्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर काही कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्याचा निर्णय तिहार कारागृह प्रशासनाकडून घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय आता कारागृह प्रशासनाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण पॅरोलवर सोडलेल्या कैद्यांपैकी ३ हजार ४६८ जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. (prisoners who were released on parole from tihar jail gone missing)
गेल्या वर्षीच्या कोरोना काळात तिहारमधून सुमारे ६ हजार ७४० कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली होती. मात्र, यापैकी आता ३ हजार ४६८ जणांचा पत्ता कारागृह प्रशासनाला लागत नाहीए. याचाच अर्थ कैदी बेपत्ता झाले आहेत. पॅरोलवर सोडण्यात आलेले कैदी विविध आजारांनी ग्रासलेले होते. कॅन्सर, एचआयव्ही, किडणीची समस्या, दमा आणि टीबी असे आजार असलेल्या कैद्यांना कारागृह प्रशासनाने पॅरोलवर सोडले होते. एकूण सोडण्यात आलेल्या कैद्यांपैकी ११८४ जणांवर दोषसिद्धी झाली होती. त्यांना तिहार, मंडोली आणि रोहिणी येथील कारागृहातून सोडण्यात आले होते.
कोरोना परिस्थिती गंभीर; निवडणूक आयोगाने बोलावली सर्वपक्षीय बैठक
पॅरोलच्या कालावधीत वाढ
कारागृह प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कैद्यांना सुरुवातीला आठ आठवड्यांसाठी पॅरोलवर बाहेर सोडण्यात आले होते. मात्र, कोरोनाचा कहर वाढत गेल्यानंतर ही मुदत अनेकदा वाढवण्यात आली. अखेरीस या कैद्यांना शरण येण्यासाठी ७ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंतची वेळ देण्यात आली होती. मात्र, ११८४ कैद्यांपैकी ११२ जण बेपत्ता झाले. प्रशासनाने कुटुंबीयांकडे चौकशी केली, तेव्हा ते घरी नसल्याचे समजले.
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला
तिहार कारागृहातील ५५५६ कैदी अंतरिम जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र, यातील केवळ २२०० कैदी परत आले. मार्च अखेरपर्यंत या कैद्यांना सरेंडर करण्यास सांगितले होते. दरम्यान, कोरोनाची स्थिती गंभीर होत गेल्यानंतर गतवर्षी सर्वोच्च न्यायालयाने कैद्यांना पॅरोल, जामिनावर बाहेर सोडण्याचा सल्ला दिला होता.