मुंबई - राफेल कराराबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यानी घटनाक्रम समजाऊन सांगितला आहे. तसेच संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनीच नोव्हेंबर 2016 मध्ये संसदेत बोलताना, राफेल विमान खरेदीसाठी 670 कोटी रुपयांना एक याप्रमाणे 36 विमान खरेदी करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर 1 ते 1.5 वर्षातच या विमानाची किंमत 1 हजार कोटींनी वाढलीच कशी ? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पीएमओ कार्यालयातील कामाचा अनेक वर्षे अनुभव असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी राफेलसंदर्भात अनुभव आणि खात्रीशीर माहिती दिली. एका खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काँग्रेस आणि मोदी सरकारच्या काळातील राफेल करारावर प्रकाश टाकला. काँग्रेसकडून डिसेंबर 2007 मध्ये राफेल करारासंदर्भात टेंडर काढण्यात आले होते. त्यानुसार सहा जणांना हे टेंडर पाठविण्यात आले. त्यापैकी फ्रान्सचे राफेल आणि युरोपीय देशांनी मिळून बनवलेलं युरोप फायटर हे विमान निश्चित करण्यात आले. मात्र, राफेलची किंमत कमी असल्याने आणि गुणवत्ता युरोप फायटरसारखीच असल्याने 2012 मध्ये राफेलला हे टेंडर देण्याचे ठरले. तसेच 1026 पैकी 18 राफेल भारत विकत घेणार आणि उर्वरीत 108 विमान हिदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) बनवणार असे ठरले होते. मात्र, 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्सला गेले अन् 36 विमान खरेदी करणार असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, त्यावेळी मोदींसमवेत संरक्षणमंत्री किंवा संरक्षण खात्याचे कुणीही अधिकारी नव्हते. मात्र, तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितल्याप्रमाणे राफेलची किंमत 7.8 बिलियन्स युरो म्हणजे 1670 ते 80 कोटी रुपये एवढी ठरल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे काँग्रेसच्या काळात हे विमान 520 कोटी रुपयांना खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. तर, 2016 मध्ये संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंनी संसदेत माहिती देताना, हे विमान 670 कोटी रुपयांना एक याप्रमाणे 36 विमान खरेदी करण्यात येणार आहेत, असे म्हटले होते. यावरुन केवळ 1 ते 1.5 वर्षात या विमानाची किंमत 1 हजार कोटी रुपयांनी वाढलीच कशी ? आणि यावर कुणीही उत्तर का देत नाही, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे.