रायपूर- छत्तीसगडमधील एका खासगी महाविद्यालयात अत्यंत असंवेदनशीलपणा दाखविणारी घटना घडली आहे. बीएड कॉलेजमध्ये 7 महिन्यांची गरोदर असलेल्या एका विद्यार्थिनीला जबरदस्तीने डान्स करायला लावला. छत्तीसगडच्या संत हरकेवल बीएड कॉलेजमध्ये ही घटना घडली आहे. या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रतिभा मिंज या विद्यार्थिनीबरोबर ही घटना घडली. प्रतिभाने ऑगस्च 2017मध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. त्यावेळी ती तीन महिन्याची गर्भवती होती. प्रतिभाने 3 फेब्रुवारी रोजी बाळाला जन्म दिला आहे. कॉलेजमध्ये प्रवेश घेताना शिक्षणाच्या दोन वर्षाच्या काळात ती बाळाला जन्म देऊ शकत नाही असं सांगत एका अॅफिडेविटवर तिच्याकडून सह्या घेतल्या होत्या. बीएड कोर्सच्या दोन वर्षाच्या काळात विद्यार्थीनी गरोदर राहू शरत नाही,असा नवा नियम कॉलेजने काढला होता. त्यामुळे हे कॉलेज सध्या वादात सापडलं असून तपासाला सामोरं जातं आहे.
24 वर्षीय प्रतिभा अंबिकापुरची निवासी आहे. कॉलेजच्या नियमांचं उल्लंघन केल्याने परीक्षेला बसू न देण्याची धमकी तिला कॉलेज प्रशासनाने दिली, असा आरोप तिने केला आहे. एप्रिलमध्ये ही परीक्षा होणार आहे. कॉलेजमधील शिक्षकांनी अनेक वेळा अपमानास्पद वागणूक दिली. इतकंच नाही, तर सात महिन्यांची गरोदर असताना एका प्रात्यक्षिक परीक्षेसाठी तिला संपूर्ण वर्गासमोर डान्स करायला लावला. मी वारंवार नकार देऊनही मला संपूर्ण वर्गासमोर डान्स करायला. परीक्षेत कमी मार्क देऊ अशी धमकी शिक्षकांनी दिल्याचा आरोप प्रतिभाने केला आहे. गरोदर असताना नाचणं हे मला व माझ्या वर्गमित्रांना लाजिरवाणं वाटत होतं पण यावर शिक्षक हसत होते, असंही प्रतिभाने सांगितलं.
प्रसुती होण्याआधी प्रतिभा दररोज कॉलेजला जायची. नियमांनुसार परीक्षेला बसण्यासाठी विद्यार्थ्याला 80 टक्के उपस्थिती आवश्यक असते. प्रतिभाची 94 टक्के उपस्थिती पूर्ण झाली होती. माझे आई वडिल जेव्हा कॉलेजमध्ये सुट्टीचा अर्ज घेऊन गेले तेव्हा मुख्याध्यापकांनी परीक्षेचं व उपस्थितीचं कारण पुढे केलं. परीक्षेपर्यंत मला सुट्टी मिळावी, अशी मागणी मी स्वतः कॉलेजमध्ये जाऊन केली. पण क्लासमध्ये बसावं लागेल. तसं न केल्यास परीक्षेला बसू देणार नाही, असं उत्तर मिळाल्याचं प्रतिक्षाने सांगितलं. दरम्यान जिल्हाधिकारी किरन कौशल यांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर कॉलेजला कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा आदेश दिला आहे.