गांधीनगर : गुजरातच्या सरकारी रुग्णालयांत खासगी डॉक्टरही लवकरच उपचार करू शकतील, असे धोरण जाहीर करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या कमी संख्येमुळे हा निर्णय घेण्यात येणार आहे.
विधानसभेत सरकारी रुग्णालयांतील बाल रोग तज्ज्ञांच्या कमी संख्येबद्दल विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मंगळवारी ही माहिती दिली. आरोग्यमंत्र्याचा प्रभार सांभाळणारे पटेल यांनी सभागृहात सांगितले की, डिसेंबर २०२० पर्यंत विविध सरकारी रुग्णालयांत बालरोग तज्ज्ञांची ५८ पदे भरण्यात येणार होती. बहुतांश डॉक्टर पदवी घेतल्यानंतर बाँडचा कालावधी पूर्ण होईपर्यंत रुग्णालयांत काम करतात व नंतर खासगी सेवा सुरू करतात. डॉक्टरांच्या अनुपलब्धतेचे मुख्य कारण म्हणजे पूर्वी गुजरातेत एमबीबीएसच्या जागा कमी होत्या; परंतु आता ५,५०० जागा आहेत. मला विश्वास आहे की, भविष्यात आम्हाला आणखी डॉक्टर उपलब्ध होतील.
पटेल यांनी सांगितले की, आतापर्यंत सरकारी रुग्णालयांत खासगी डॉक्टरांना मानद सेवा देण्याची परवानगी नव्हती. आता ती देण्यात येईल. आम्ही प्रसिद्ध खासगी डॉक्टरांच्या सेवा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लवकरच एक धोरण जाहीर करण्यात येणार आहे. अनेक खासगी डॉक्टर समाजसेवा करू इच्छितात. नव्या धोरणांतर्गत ते सरकारी रुग्णालयांत रुग्णांचा उपचार करू शकतील व वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना शिकवूही शकतील.