हॉस्पिटलचं बिल न भरल्याने ६० वर्षीय वृद्धाला खाटेला बांधले; दोषींवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 08:59 AM2020-06-07T08:59:36+5:302020-06-07T09:00:17+5:30
हॉस्पिटलमधील या रुग्णाचा बेडवर बांधलेल्या अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
शाजापूर – मध्य प्रदेशातील शाजापूर येथे खासगी रुग्णालयात ६० वर्षाच्या वृद्ध रुग्णास खाटेला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णासोबत केलेल्या अशा गैरवर्तवणुकीमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने रुग्णालय प्रशासनाने या वृद्ध रुग्णास बांधून ठेवल्याचा आरोप रुग्णांच्या मुलीने केला आहे.
हॉस्पिटलमधील या रुग्णाचा बेडवर बांधलेल्या अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र रुग्णालयाने या आरोपाचं खंडन केले आहे. या प्रकरणातील दोषींना सोडणार नाही असा इशारा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी दिला आहे. शनिवारी हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस, प्रशासन आणि आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. शनिवारी रात्री उशीरापर्यंत या घटनेची चौकशी सुरु होती.
तर रुग्णाच्या मुलीने केलेले आरोप हॉस्पिटलच्या प्रशासनाने फेटाळून लावले आहेत. त्रास होत असल्याने हा रुग्ण हॉस्पिटलमधून पळून जात होता, त्यामुळे त्याला बांधण्यात आले. शनिवारी याबाबत मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ट्विट करुन वृद्ध नागरिकासोबत अशाप्रकारे केलेला क्रूर छळ आहे असं सांगितले. दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचंही ते म्हणाले.
शाजापुर के एक अस्पताल में वरिष्ठ नागरिक के साथ क्रूरतम व्यवहार का मामला संज्ञान में आया है। दोषियों को बख्शा नहीं जायेगा, सख्त से सख्त कार्रवाई की जायेगी।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) June 6, 2020
राजगड जिल्ह्यातील रनारा गावातील रहिवासी ६० वर्षीय लक्ष्मीनारायण दांगी यांना पोटासंदर्भात विकार असल्याने १ जूनला खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारामुळे त्यांच्या आरोग्यात सुधार होऊन त्यांना डिस्चार्ज घेऊन घरी जाण्याची इच्छा होती. रुग्णाची मुलगी सीमा दांगीने सांगितले की, रुग्णाला घरी घेऊन जाताना हॉस्पिटलने बिलाची रक्कम भरण्यास सांगितली. बिलाची रक्कम पूर्ण न भरल्याने रुग्णालयाने माझ्या वडिलांना बेडला बांधून ठेवलं. पैशाच्या कारणावरुन हॉस्पिटलच्या काही स्टाफसोबत वाद झाला होता. त्यानंतर वृद्ध रुग्णाला बेडला बांधून ठेवले. त्यांना खाता-पिताही येत नव्हते असं हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कारवाई करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सिंथिया डी रिचीसोबत पाक पंतप्रधान इम्रान खान यांना करायचा होता सेक्स; धक्कादायक खुलासा
...तर खुलासा लवकरच होईल; अभिनेता सोनू सूदवर शिवसेना नेते संजय राऊतांचा गंभीर आरोप
जाणून घ्या, एटीएम मशीनला हात न लावता अवघ्या २५ सेकंदात ग्राहकांना पैसे काढता येणार!
देशात कोरोनाचा प्रचंड कहर, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा खरा ठरणार?