नवी दिल्ली : भारत सरकारने काही मार्गांवर खासगी रेल्वेंना परवानगी देण्याचा निर्णय घेतला असला तरी या मार्गावर चालणाऱ्या सरकारी रेल्वे गाड्यांच्या स्वस्त तिकिटांशी स्पर्धा करावी लागणार असल्याबद्दल संभाव्य निविदाधारक चिंतेत आहेत. आधीच्या निविदांना दोनच संस्थांकडून प्रतिसाद मिळाला. त्यातही एक निविदाधारक रेल्वेचीच एक पीयूसी आहे. संबंधित मार्गावर रेल्वे स्वत:च स्वस्त तिकिटात गाड्या चालविणार असेल, तर आमची महाग तिकिटे कोण घेणार, असा इच्छुक निविदाधारकांचा सवाल आहे, असे सूत्रांनी सांगितले. यावर आता सरकार नव्याने विचार करत असून एक नियामक स्थापन करण्याच्या प्रस्तावावर काम केले जात आहे.१२ क्लस्टर्स खासगी रेल्वेसाठी खुले करण्याचा निर्णय रेल्वेने आधी घेतला होता. तथापि, आमच्या रेल्वे ज्या स्थानकावरून निघतील, तेथून ५० कि.मी.च्या परिघातून आमच्या गाडीच्या वेळेच्या एक तासात कोणतीही गाडी रेल्वेने सोडू नये, अशी मागणी इच्छुक निविदाधारकांनी केली होती. ती फेटाळण्यात आली होती. आता त्यावर नव्याने विचारमंथन केले जात आहे.
रेल्वेच्या स्वस्त तिकिटामुळे खासगी भागीदार चिंतित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 6:02 AM