नवी दिल्ली : कमी गर्दीच्या आणि पर्यटन मार्गांवर खासगी रेल्वे चालविण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, येत्या १०० दिवसांत त्यासाठी बोली मागविण्यात येणार आहेत. रेल्वे बोर्डाच्या दस्तावेजातून ही माहिती समोर आली आहे.पहिल्या टप्प्यात प्रायोगिक पातळीवर रेल्वेचीच पर्यटन व तिकीट विक्री शाखा आयआरसीटीसीला दोन रेल्वे चालविण्यास दिल्या जातील. तिकिटे आणि रेल्वेतील सेवा आयआरसीटीसीकडे सोपवून त्यापोटी रेल्वेला ठराविक रक्कम मिळेल. कमी गर्दीच्या आणि पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गावर या रेल्वे धावतील. रेक्सचा ताबा आयआरसीटीसीला दिला जाईल. वार्षिक भाडे म्हणून ठराविक रक्कम आयआरसीटीसीकडून रेल्वेची वित्तीय शाखा आयआरएफसीला दिली जाईल.रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी बोर्डाचे सदस्य आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, पहिल्या टप्प्यातील प्रयोगानंतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या मार्गांवर रेल्वे चालविण्यासाठी खासगी संस्थांकडून इरादापत्रे मागविली जातील. निवडक मार्गावर प्रवासी रेल्वे चालविण्याचे हक्क या संस्थांना दिले जातील.सबसिडी सोडण्यासाठी मोहीम राबविणाररेल्वे तिकिटांवरील सबसिडी प्रवाशांनी सोडावी, यासाठी मोहीम राबविली जाईल. तिकीट बुकिंगमध्ये सबसिडीसह व सबसिडीशिवाय असे दोन्ही पर्याय असतील. प्रवासी रेल्वेसाठी जेवढा खर्च रेल्वेला येतो, त्यातील फक्त ५३ टक्के तिकिटांतून वसूल होतो. हा तोटा भरून काढण्यासाठी उज्ज्वला मोहिमेप्रमाणे सबसिडी सोडण्याचे आवाहन करणारी मोहीम राबविणार आहे.
ठरावीक मार्गांवर धावणार खासगी रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 2:55 AM