जबलपूर: मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका आरटीओ अधिकाऱ्याच्या घरात कोट्यवधी रुपयांची संपत्ती सापडली आहे. हे घर आहे की, राजवाडा? असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला. जबलपूरचा आरटीओ अधिकारी संतोष पाल सिंग याच्या घरावर छापा टाकला, ज्यात त्याच्या उत्पन्नापेक्षा कैकत पट जास्त मालमत्ता आढळून आली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने संतोषच्या घरावर हा छापा टाकला होता. आरोपीने घरात जागोजागी काळा पैसा लपून ठेवण्यात आला होता. अधिकाऱ्याचे घरही अगदी आलिशान असून, त्याने घरात स्वतःसाठी थिएटर बांधले आहे. तपासादरम्यान संतोष पाल सिंहची अनेक आलिशान घरे, महागड्या गाड्या आणि इतर मालमत्तांची कागदपत्रे सापडली आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) संतोष पाल याच्यावर छापा टाकला. त्याच्या घरातून 16 लाखांच्या रोख रकमेसह काळ्या पैशातून मिळवलेल्या अमाप मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. प्राथमिक तपासात उघड झालेल्या पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की, त्याच्या सेवेच्या कालावधीत आरटीओच्या वैध स्रोतांमधून मिळालेला खर्च आणि मिळविलेली मालमत्ता 650 टक्के आहे. यादरम्यान त्याच्या नावावर अर्धा डझन घरे आणि फार्महाऊससह आलिशान गाड्या आणि 16 लाख रुपयांचे दागिने असल्याची माहिती टीमला मिळाली आहे.
EOW SP देवेंद्र प्रताप सिंह यांच्या म्हणण्यानुसार, RTO संतोष पाल आणि त्याची लिपिक पत्नी रेखा पाल यांच्याकडे प्रचंड संपत्ती सापडली आहे. कागदपत्रांच्या तपासादरम्यान पाल दाम्पत्याच्या नावावर शंकर शाह वॉर्डात 1150 चौरस फूट, शताब्दीपुरम येथे 10 हजार स्क्वेअर फूटच्या दोन निवासी इमारती, कस्तुरबा गांधी वॉर्डमध्ये 570 स्क्वेअर फूट आणि गडफाटक येथे 771 स्क्वेअर फूट घर याशिवाय चारागा रोड गावातील 1.4 एकर जमीन आहे. त्यावर बांधलेल्या फार्म हाऊसचीही माहिती मिळाली आहे.