नवी दिल्ली : रेल्वे प्रवासाची आरक्षित आणि अनारक्षित तिकिटांची विक्री करण्याच्या कामाचे खासगीकरण करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार रेल्वेच्या अधिकृत तिकीट एजंटना रेल्वे स्टेशनच्या परिसरात ‘यात्री तिकीट सुविधा केंद्र’ सुरु करण्याची परवानगी दिली जाणार आहे. रेल्वे स्टेशनमधील नियमित तिकिट खिडक्यांप्रमाणेच या खासगी तिकीट खिडक्या असतील व तेथे सर्व प्रकारची आरक्षित व अनारक्षित तिकिटे प्रवाशांना मिळू शकतील.सध्या रेल्वेची तिकिटे रेल्वे स्टेशनवरील रेल्वेच्या अधिकृत तिकिट खिडक्यांवर मिळतात व रेल्वेच्या ‘कॉम्युटराईज्ड पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टिम’ (पीआरएस)वरून रेल्वेच्या आरक्षण केंद्रांवर आरक्षित तिकिटे मिळतात. याखेरीज अधिकृत ट्रॅव्हल एजन्टना फक्त ई-तिकिटे विकण्याचे परवाने दिले गेले आहेत.रेल्वे मंडळाने अलीकडेच दिलेल्या निर्देशानुसार आता प्रवाशांना तिकिट काढण्याची सुविधा अधिक चांगली व सुलभतेने मिळावी यासाठी आरक्षित व अनारक्षित तिकिटविक्रीमध्ये खासगी क्षेत्राचाही सहभाग घेण्याचे ठरविण्यात आले आहे. यासाठी खासगी व्यक्तींना ‘यात्री तिकीट सुविधा केंद्र’ चालविण्यास दिली जातील व त्याकरता रेल्वेची ‘पीआरएस’ संगणक यंत्रणा वापरण्याची त्यांना मुभा दिली जाईल. रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, सुरुवातीस रेल्वेच्या अधिकृत तिकीट एजन्टनाच ‘यात्री तिकीट सुविधा केंद्रे’ चालवू दिली जातील. त्यासाठी ज्यांच्याकडे पाच वर्षांचा अनुभव आहे, ज्यांच्याकडे रेल्वे स्टेशनच्या बाहेर कार्यालयाची जागा आणि सुयोग्य सोयी-सुविधा आहेत, अशाच एजन्टची यासाठी निवड केली जाईल. या खासगी ‘यात्री तिकिट सुविधा केंद्रा’वर रेल्वेच्या संगणकीकृत ‘पीआरएस’ केंद्रांच्या धर्तीवर जास्तीत जास्त चार टर्मिनल सुरु करण्याची परवानगी दिली जाईल.सूत्रांनी सांगितले की, या खासगी तिकिट विक्री केंद्रांना विशेषत: आरक्षणाच्या बाबतीत काळाबाजार किंवा अन्यगैरप्रकार करण्यास वाव राहू नये ही केंद्रे रेल्वेच्या ‘पीआरएस’ तिकिट विक्रीच्या खिडक्या सुरु झाल्यानंतर एक तासानंतर सुरु होतील. रेल्वेच्या पीआरएस खिडक्यांवर सर्वसाधारण आरक्षण सकाळी ८ वाजता व तात्काळ तिकिटांचे आरक्षण स. १० वाजता सुरु होते. खासगी खिडक्यांवर ते अनुक्रमे स. ९ व स. ११ वाजता सुरु होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रेल्वे तिकीटविक्रीचे खासगीकरण
By admin | Published: October 10, 2014 3:37 AM