राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार उल्लंघन प्रकरणी कारवाईची नोटीस, लोकसभा अध्यक्षांकडे पाठविली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 06:02 PM2018-01-06T18:02:30+5:302018-01-06T18:42:36+5:30
राज्यसभा नेते व अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या टीकेवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विशेषाधिकारांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची नोटीस पाठवण्यात आली आहे.
नवी दिल्ली- राज्यसभा नेते व अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या टीकेवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर विशेषाधिकारांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची नोटीस पाठवण्यात आली आहे. राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे शनिवारी पाठवली आहे. राहुल गांधी लोकसभेचे सदस्य असल्याने हे प्रकरण लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे पाठविण्यात आलं आहे.
भाजपाचे राज्यसभेचे खासदर भुपेंद्र यादव यांनी सभागृहात राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषाधिकरांचं उल्लंघन प्रकरणी कारवाईचा मुद्दा उपस्थित केला होता. 'राहुल गांधी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले आहेत. राहुल गांधी यांनी जेटलींच्या आडनावाच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये बदल करुन ते Jaitley ऐवजी Jaitlie असं लिहीले आहे. यातून जेटलींचा अपमान झाला. असं राहुल गांधींवर आरोप करताना भुपेंद्र यादव यांनी म्हंटलं.
दरम्यान, भुपेंद्र यादव यांच्या प्रस्वावाची तपासणी करण्यात आली आहे. तसंच ही बाब आमच्या अधिकार क्षेत्रात नसल्यामुळे ते लोकसभा सभापतींकडे पाठवण्यात आलं आहे. राहुल गांधी लोकसभेचे सदस्य असल्याने त्यांच्यावर येथेच कारवाई केली जाऊ शकते, असं व्यंकय्या नायडू यांनी म्हंटलं.
राहुल गांधी यांनी २७ डिसेंबर रोजी राज्यसभेचे नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर ट्विट करून टीका केली होती.