karnataka assembly elections 2018: काँग्रेसचा सर्वात श्रीमंत युवा उमेदवार, 1 हजार कोटींची संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2018 08:45 AM2018-04-23T08:45:07+5:302018-04-23T08:45:07+5:30
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाड्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट दिलं आहे.
बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट दिलं आहे. भाजपा, काँग्रेससह जवळपास सर्वच पक्षांनी श्रीमंत उमेदवारांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. आजतकच्या वृत्तानुसार, काँग्रेसने दिलेल्या उमेदवारापैकी सर्वात श्रीमंत उमेदवार प्रिया कृष्णा आहे. त्यांच्याकडे 1020.5 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
कर्नाटक निवडणुकीत स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या चेहऱ्यांमध्ये काँग्रेसचे तीन उमेदवार सर्वात श्रीमंत आहेत. प्रिया कृष्णा यांच्याशिवाय एम.टी.बी. नागाराजू, डी.के शिवकुमार आणि अनिल लाड यांचंही श्रीमंत उमेदवारांच्या यादीत नाव आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार प्रिया कृष्णा यांनी नामांकन पत्राबरोबर दाखल केलेल्या शपथ पत्रात 1020.5 कोटींची संपत्ती असल्याची घोषणा केली आहे. याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार एम.टी.बी नागाराजू यांच्याकडे 709.3 कोटींची संपत्ती आहे. राज्य सरकारचे मंत्री डी.के.शिवकुमार यांनाही काँग्रेसने तिकिट दिलं आहे. त्यांच्याकडे 619.8 कोटी रुपयांची संपत्ती आहे. काँग्रेसच्या श्रीमंत उमेदवारांच्या यादीत बेल्लारी सिटीचे उमेदवार अनिल लाड यांचंही नाव आहे. ते 342.2 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.
भाजपानेही दिली श्रीमंत उमेदवारांना तिकिटं
भाजपानेही कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी धनाढ्य उमेदवारांना तिकिट दिलं आहे. कर्नाटकमध्ये के.आर पुरा जागेसाठी भाजपाचे उमेदवार नंदीश रेड्डी पक्षाचे सर्वात श्रीमंतर उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 303.6 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसंच 11 कार व 1 ट्रॅक्टर आहे.