Parliament Monsoon Session । नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या फ्लाइंग किसवरून चांगलेच राजकारण तापले आहे. भाजपाच्या महिला खासदारांनी बुधवारी राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सभापतींकडे केली. राहुल यांनी सभागृहात भाजपा खासदाराला फ्लाइंग किस केला असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाने केला आहे. यावरून आता राजकारण तापले असून विरोधी पक्षाच्या खासदारांनी भाजपाला फटकारले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी गांधी यांच्या त्या कृत्याचा दाखला देत भाजपाला लक्ष्य केले. फ्लाइंग किसवेळी घडलेला प्रसंग सांगताना त्या म्हणाल्या, "मी तिथे व्हिजिटर गॅलरीत होती आणि राहुल गांधींनी तिथून निघताना केवळ प्रेमाचा हावभाव म्हणून हे कृत्य केले. पण, भाजपाला द्वेषाची सवय झाली आहे, म्हणूनच ते हे प्रेम स्वीकारत नाहीत."
लोकसभेत फ्लाइंग किसवरून वाद बुधवारी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान खासदार राहुल गांधी यांनी भाषण करून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भाषण करताना काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. दरम्यान, राहुल गांधी सभागृहाबाहेर पडले. यानंतर स्मृती इराणी म्हणाल्या की, आज ज्यांना माझ्याआधी बोलण्याचा अधिकार देण्यात आला होता त्यांनी (राहुल गांधी) निघताना अशोभनीय वर्तन केले. संसदेतील महिला सदस्यांसमोर फ्लाइंग किस देणारी व्यक्ती ही स्त्रीद्वेषीच असू शकते.
दरम्यान, स्मृती इराणी यांच्या या आरोपानंतर सभागृहातील वातावरण तापले. भाजपाच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सभागृहात भाषणादरम्यान असभ्य हावभाव केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.