शेतकरी आंदोलनाबाबत अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौतने केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. विरोधक कंगनावर जोरदार हल्लाबोल करत आहेत. कंगना राणौतने शेतकऱ्यांची आणि संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेससोबतच अनेक नेत्यांकडून सातत्याने होत आहे. याच दरम्यान ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी सीबीआयने कंगना राणौतला अटक करावी, असं म्हटलं आहे.
दैनिक भास्करशी बोलताना प्रियंका चतुर्वेदी यांनी कंगना राणौतवर निशाणा साधत आता खासदार झाल्यामुळे बोलण्यापूर्वी विचार करायला हवा, असे सांगितलं. एका खासदाराने असे बेजबाबदार विधान करणं, हे आश्चर्यकारक आहे असंही म्हटलं. "बलात्कार हा इतका हलका शब्द आहे का की कंगना राणौत देशातील शेतकऱ्यांना बलात्कारी म्हणतेय?"
"कंगना राणौतकडे अशी माहिती आहे का जी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे नाही? सीबीआयने कंगना राणौतला ताबडतोब अटक करावी, जेणेकरून तिची चौकशी करून कळेल की जर भाजपा खासदाराकडे एवढी महत्त्वाची माहिती होती, तर ती गृहमंत्रालयाला का दिली नाही?" असा सवाल प्रियंका यांनी विचारला आहे.
टीका करताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, "कंगना राणौत या भ्रमात आहे की ती जगातील सर्वात ज्ञानी महिला आहे. तिला असं वाटतं की तिच्याकडे सर्व माहिती आहे. चित्रपटसृष्टीतील राजकारण फक्त तिलाच माहीत होतं. सुशांत सिंह राजपूत काय करायचा हे फक्त तिलाच माहीत होतं."