नवी दिल्ली : रेल्वे अपघातांच्या मुद्द्यावरून गुरुवारी लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांना 'रील मंत्री' म्हटल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला. या मुद्द्यावरून आता शिवसेनेच्या (UBT) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही रेल्वेमंत्र्यांचा समाचार घेतला आहे. अश्विनी वैष्णव यांना आत्मपरीक्षण करावं लागेल आणि देशाला उत्तर द्यावं लागेल, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितलं.
खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, "मोदीजींच्या 'रील' मंत्र्यांना उत्तर मागितल्यामुळं ते संतप्त झाले. NDA 1.O ला वाटतं की, त्यांच्याकडं उत्तर मागितलं जाणार नाही. ते विसरले की, आता विरोधकही खूप मजबूत झाले आहेत. रेल्वेमंत्र्यांना आत्मपरीक्षण करावं लागेल. पूर्वीचे रेल्वे मंत्री जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असत. मात्र, इथं त्यांना काहीच वाटत नाही आणि लोकेशनवर जाऊन शूटिंग केलं जातं. मग त्यांचे रील बनवले जातात आणि मग तुम्ही त्यांची जाहिरात करता. प्रसिद्धी आणि रील मंत्री सोडून त्यांनी रेल्वे मंत्री बनून देशाला उत्तर दिलं पाहिजे."
दरम्यान, गुरुवारी (१ ऑगस्ट) देशातील वाढत्या रेल्वे अपघातांवर लोकसभेत चर्चेदरम्यान गदारोळ झाला. सभागृहात विरोधी खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उभे राहिल्यावर काही नेत्यांनी गदारोळ सुरू केला. यावेळी विरोधी खासदारांनी त्यांना 'रीलमंत्री' म्हणत टोमणा मारला. हे ऐकून शांत स्वभावाचे अश्विनी वैष्णव हे चांगलेच संतापल्याचे दिसून आले.
"आम्ही रील बनवणारे नाही..."रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, आम्ही फक्त रील बनवणारे नाही, आम्ही काम करणारी माणसं आहोत. इथे जी लोकं ओरडत आहेत, त्यांनी सांगावे की, काँग्रेसने ५८ वर्षांच्या सत्तेत एक किलोमीटर ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (एटीपी) का बसवले नाही? यावेळी गदारोळ करणाऱ्या खासदारांवर संतापून "शांत बसा, एकदम शांत बसा...काहीही बोलतात..." असे म्हणत रेल्वेमंत्र्यांनी त्यांना खाली बसण्यास सांगितले.