नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात संपावर बसलेल्या कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ शिवसेनेच्या (ठाकरे गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी पुढे आल्या आहेत. तसेच, प्रियांका चतुर्वेदी यांनी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) अध्यक्ष पीटी उषा यांच्या वक्तव्यावर सुद्धा निशाणा साधला आहे. पीटी उषा यांनी गुरुवारी भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात बसलेल्या कुस्तीपटूंवर टीका केली. यावर आज प्रतिक्रिया देताना प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, पीटी उषा यांनी हे समजून घेतले पाहिजे की आपण महिला खेळाडूंसाठी एकत्रितपणे बोलले पाहिजे.
पीटी उषा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, लैंगिक छळाचे आरोप असलेले खासदार पळून जातात आणि पीडितांना न्यायासाठी संघर्ष करावा लागतो, तेव्हा देशाची प्रतिमा मलिन होते. तसेच, प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "मला खेद वाटते मॅडम, आपण एकत्रितपणे आमच्या खेळाडूंसाठी बोलले पाहिजे, त्यांची प्रतिमा डागाळल्याचा आरोप करू नये. ते आमच्या देशाला आणि आम्हाला अभिमानाचे कारण देतात." याआधी, तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोइत्रा यांनी कुस्तीपटूंनी भारताची प्रतिमा खराब केल्याचा आरोप करत पीटी उषा यांच्यावर टीका केली.
काय म्हणाल्या होत्या पीटी उषा?इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA)अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार पीटी उषा यांनी गुरुवारी सांगितले की, कुस्तीपटूंमध्ये शिस्तीचा अभाव आहे कारण ते ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात पुन्हा विरोध सुरू करत आहेत, परंतु माझ्याकडे आले नाहीत. आमचा विश्वास आहे की, लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी आयओएची एक समिती आणि ऍथलीट्स आयोग आहे.
काय आहे प्रकरण?विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांसारख्या देशातील आघाडीच्या कुस्तीपटूंसह अनेक कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ आणि धमक्यांचे आरोप केले आहेत. कुस्तीपटू आता दिल्लीतील जंतरमंतरवर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात निदर्शने करत आहेत.