वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वाराणसीमध्ये रोड शो करणार आहेत आणि उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्याविरोधात कोणाला उभे करणार याचा सस्पेन्स काँग्रेसने संपविला असून प्रियंका गांधी यांना उभे करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. आता 4 टप्पे उरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीतून काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियंका गांधी यांना उमेदवारी देण्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अनेकदा प्रियंका गांधी यांनी तसे संकेतही दिले होते. काँग्रेस अध्यक्षांनी सांगितले तर लढेन असे त्यांनी प्रसारमाध्यमांनाही सांगितले होते. मात्र, काँग्रेसने वाराणसीच्या उमेदवाराचा सस्पेन्स उठविला आहे. या ठिकाणी मोदींविरोधात अजय राय यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
मतांचे गणित काय?वाराणसीमध्ये बनिया समाजाची लोकसंख्या ३.२५ आहे. हा समाज भाजपचा प्रमुख मतदार समजला जातो. परंतु, नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्दावर नाराज असलेल्या बनिया समाजाचे मते वळविण्यास काँग्रेसला यश आल्यास वाराणसीमध्ये मोदींसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. वाराणसीमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या अडीच लाख आहे. विश्वनाथ कॉरिडोर बनविण्यासाठी ब्राह्मण समजाचे घरं मोठ्या प्रमाणात जाणार आहे. तसेच एसटी/एसटी कायद्यामुळे ब्राह्मण समाज सरकारवर नाराज आहे. या मतदारांवर उभय पक्षांची नजर असणार आहे. वाराणसीत तीन लाखांच्या जवळ मुस्लीम समाज आहे. भाजपला पराभूत करण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच मुस्लीम समाज मतदान करत असल्याची वस्तुस्थिती आहे.
मात्र, गेल्या साडेचार वर्षांत मोदींनी वाराणसीमध्ये ज्या पद्धतीने विकास केला, त्यावरून मतदार त्यांना डावलतील, याची शक्यता फारच कमी आहे.