नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अमेठीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे उत्तर प्रदेशमध्ये संतापाचे वातावरण आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने देखील टीकास्त्र सोडलं आहे. याच दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ प्रियंका गांधी यांनी ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच गुन्हेगारांवर कारवाईची मागणी केली आहे.
प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. योगी सरकारला 24 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. "अमेठीमध्ये मुलीला निर्दयपणे मारहाण झाल्याचा हा प्रकार निंदनीय आहे. योगी आदित्यनाथजी, तुमच्या राज्यात दररोज दलितांच्या विरोधात सरासरी 34 तर महिलांच्या विरोधात 135 गुन्ह्यांची नोंद होत आहे. तरीदेखील तुमची कायदाव्यवस्था झोपली आहे" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.
"जर 24 तासांच्या आत या अमानवी कृत्य करणाऱ्या अपराध्यांना अटक केली नाही, तर काँग्रेस पक्षाकडून जोरदार आंदोलन करून तुम्हाला जागं करण्याचं काम केलं जाईल" असं देखील प्रियंका यांनी म्हटलं आहे. प्रियंका गांधींनी शेअर केलेल्या व्हिडीमध्ये दोन व्यक्ती एका मुलीला खाली पाडून तिला मारहाण करताना दिसत आहेत. तर काही लोक मोबाईलद्वारे या धक्कादायक प्रकाराचं व्हिडीओ शूट करताना दिसत आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मुलांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याच्या प्रियंका गांधींच्या गंभीर आरोपांवर सरकारने दिलं उत्तर
प्रियंका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केला होता. आपल्या मुलांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याचा दावा केला. तसेच सरकारकडे आता कोणतंच काम नाही आहे का? असं म्हणत निशाणा साधला होता. यानंतर आता मुलांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याच्या प्रियंका यांच्या आरोपांवर सरकारने उत्तर दिलं आहे. सरकारने स्वत: चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्राथमिक तपासानंतर आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने प्रियंका गांधींचे आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे.