नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मोठी खेळी केली आहे. प्रियांका गांधी यांची काँग्रेसनंउत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. प्रियांका गांधींकडेउत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाचं नेतृत्व ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे.
प्रियांका गांधी आतापर्यंत सक्रीय राजकारणापासून दूर होत्या. त्यांच्याकडे काँग्रेसमधलं कोणतंही पद नव्हतं. मात्र आता राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. प्रियांका यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाचं नेतृत्त्व देण्यात आलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे फायरब्रँड नेते समजले जातात. आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात तेच भाजपाचे स्टार प्रचारक असतील. त्यांच्या आक्रमक प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रियांका गांधींकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रियांका गांधींनी अनेक निवडणुकांमध्ये पक्षासाठी काम केलं आहे. उमेदवार निवड, व्यूहरचना अशा विविध बाबतीत त्यांनी काँग्रेससाठी मोलाची कामगिरी बजावली आहे. मात्र त्यांच्याकडे पक्षाचं कोणतंही पद नव्हतं. मात्र आता त्यांच्याकडे थेट उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी त्यांची उत्तर प्रदेश पूर्वच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. तर मध्य प्रदेशमधील काँग्रेसचा सत्तेचा वनवास संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची नेतृत्त्व सोपवण्यात आलं आहे. तर वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्याकडे हरयाणाची सूत्रं देण्यात आली आहेत.