Priyanka Gandhi Arrested: उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये गेल्या ३६ तासांपासून नजरकैदेत असलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रियंका गांधी यांनी कलम १४४ चं उल्लंघन आणि शांतता भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नजरकैदेत ठेवलेल्या प्रियंका गांधींवर आता अटकेची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी रोष व्यक्त केला असून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
प्रियंका गांधी यांना थोड्याच वेळात कोर्टासमोर हजर केली जाण्याचीही शक्यता आहे. पोलिसांनी हवं तर मला अटक करावी, पण मी शेतकरी कुटुंबीयांना भेटल्याशिवाय परतणार नाही, अशी ठाम भूमिका प्रियंका गांधी यांनी घेतली आहे. याशिवाय आज प्रियंका यांनी एक व्हिडिओ देखील ट्विट केला होता. यात पंतप्रधान मोदींना त्यांनी घडलेल्या घटनेबाबत थेट सवाल विचारले आहेत.
"लखीमपूरला या आणि शेतकऱ्यांची अवस्था समजून घ्या. त्यांचं संरक्षण करणं हा तुमचा धर्म आहे. सगळ्यांच्या हक्कांचं रक्षण करणं हा संविधानाचा धर्म आहे. ज्यावर तुम्ही शपथ घेतली आणि त्याप्रती तुमचं कर्तव्य देखील आहे. जय हिंद..जय किसान", असं ट्विट करत प्रियंका गांधी यांनी मोदींना उत्तर प्रदेशात येण्याचं आवाहन केलं होतं.
शेतकऱ्यांना मारणारे मोकाट अन् मी पोलिसांच्या ताब्यातलखीमपूर घटनेतील शेतकरी कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेल्या प्रियंका गांधी यांना पोलिसांनी अडवलं होतं. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. पोलीस अडवणूक करत असताना प्रियंका गांधी पोलिसांना खडेबोल सुनावतानाच एक व्हिडिओ देखील समोर आला होता. यात शेतकऱ्यांना चिरडणारे आज मोकाट आहे आणि तुम्ही मला अटक करत आहात. दोषींवर कारवाई कधी करणार आहात? असा सवाल उपस्थित केला होता.