नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर देशात सुरू आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही वाढत चालली आहे. मात्र, कोरोना लस आणि रेमडेसिवीर इंजेक्शन या दोन्ही गोष्टींची देशात चणचण निर्माण झाली आहे. यातच काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. देशवासीयांना प्राधान्य का दिले नाही, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. (priyanka gandhi asked to modi govt that why were indians not prioritised)
गेल्या काही दिवसांपासून कोरोना लस आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात निर्णय घेऊन निर्यातबंदी केली आहे. याच मुद्द्यावरून प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरले आहे. एनआयए या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे. रेमडेसिवीरसाठी लोक वणवण फिरत आहेत. गेल्या सहा महिन्यात १० लाखांहून अधिक रेमडेसिवीरची निर्यात करण्यात आली. सरकारने गेल्या तीन महिन्यात सहा कोटी लसींची निर्यात केली, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
भारतीयांना प्राधान्य का दिले नाही?
देशातील तीन ते चार कोटी लोकांना लस देण्यात आली. तुम्ही देशवासियांना प्राधान्य का दिले नाही? तुम्ही प्रसिद्धीत व्यस्त आहात. कोरोनाची लस मॉरिशिअस, नेपाळला जात असल्याचे आम्ही पाहात होतो. तुम्ही सहा कोटी लस निर्यात केल्या आणि देशवासियांना तीन ते चार कोटी लस दिल्या. योग्य धोरण नसल्यानेच तुटवडा जाणवत आहे, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.
गुड न्यूज! १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळणार; योगी सरकारचा निर्णय
कोरोनाच्या स्थितीकडे दुर्लक्ष
केंद्र सरकारकडे आठ ते नऊ महिने होते. दुसरी लाट येणार सांगत असतानाही सरकारने दुर्लक्ष केले. युद्धपातळीवर काम करत तुम्ही सुविधा निर्माण करू शकत होता. सध्या देशात फक्त २ हजार ट्रक ऑक्सिजनची वाहतूक करू शकतात. देशात ऑक्सिजन आहे, पण जिथे पोहचण्याची गरज आहे पोहोचत नाही, असा दावाही प्रियंका गांधी यांनी केला.
“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”
पंतप्रधान मोदी निवडणुकीत व्यस्त
रुग्णलयांमध्ये सुविधा का वाढवली नाही, अशी विचारणा करत ते निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. स्टेजवर जाऊन हसत आहेत. देशभरात लोक मदत मागत असताना, रडत असताना तुम्ही हसू कसे शकता. हे सरकारचे अपयश आहे, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.