नवी दिल्ली - उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचे राजकीय युद्ध काही थांबायला तयार नाहीत. योगी आदित्यनाथ यांनी शासकीय रुग्णालयात दिलेल्या भेटीदरम्यान पत्रकारांना बंद खोलीत डांबून ठेवण्यात आलेल्या घटनेवरून प्रियंका यांनी योगींचा समाचार घेतला आहे. 'नेताजी ये पब्लिक है, ये सब जानती है' असे म्हणत प्रियंका गांधींनी योगींवर निशाना साधला.
प्रसारमाध्यमात आलेल्या एका बातमीत, योगी आदित्यनाथ यांनी रविवारी मुरदाबाद येथील शासकीय रुग्णालयाला भेट दिली होती. यावेळी योगी आदित्यनाथ यांना पत्रकारांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून प्रसार माध्यमांच्या प्रतीनिधींना बंद खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. प्रियांका गांधी यांनी याच बातमीचा आधार घेऊन आदित्यनाथ सरकारवर टीका केली. पत्रकारांना बंदी केले जात आहे, प्रश्नावर परदा टाकण्यात येत आहे. जनतेच्या अडचणीचा विचार केला जात नाही. बहुमताने सत्तेत आलेली भाजप सरकार आता जनतेच्या प्रश्नांपासून तोंड फिरवत आहे. 'नेताजी ये पब्लिक है, ये सब जानती है' असा खोचक टोला प्रियंका गांधींनी योगींना लागवला
वाढत्या गुन्हेगारीमध्ये योगी सरकार अपराध्यांना शरण गेलं आहे. गुन्हेगार खुलेआम फिरत आहेत, गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही, पण भाजप सरकारच्या कानांवर कोणतीच गोष्ट येत नाही. उत्तरप्रदेश सरकारने आत्महत्या केली आहे का? असा सवाल याआधी प्रियंका गांधींनी केला होता. यावरून योगींनी पलटवार करत प्रियंका गांधींना आपल्या शैलीत उत्तर दिले होते. दिल्ली, इटली किंवा इंग्लंडमध्ये बसून चर्चेत राहण्यासाठी काहीतरी करावे लागेल त्यामुळे काहींना काही गोष्टी करत राहणे पसंद आहे. अशी टीका योगींनी केली होती.