Priyanka Gandhi Bharat Jodo Yatra:“भारत जोडो यात्रा आशेचा नवा किरण, देशाला एका नव्या वाटेवर घेऊन जाईल”: प्रियंका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 03:40 PM2023-01-30T15:40:26+5:302023-01-30T15:41:02+5:30
Priyanka Gandhi Bharat Jodo Yatra: खुल्या मनाने भारत जोडो यात्रेचे स्वागत केल्याबाबत प्रियंका गांधींनी जम्मू-काश्मीरच्या जनतेला धन्यवाद दिले.
Priyanka Gandhi Bharat Jodo Yatra: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १४५ दिवस, १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर येथे पोहोचली आहे. याच ठिकाणी आता भारत जोडो यात्रेची सांगता होत आहे. या समारोपासाठी देशभरातील काँग्रेसचे नेते आणि इतर विविध पक्षांचे नेते उपस्थित राहिले. राहुल गांधी यांच्या भगिनी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी समारोप सभेला उपस्थित राहिल्या. यावेळी जनतेला संबोधित करताना, भारत जोडो यात्रा नवा आशेचा किरण असून, देशाला एका नव्या वाटेवर घेऊन जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, संपूर्ण देशाने भारत जोडो यात्रेला पाहिलं आणि समर्थनही दिलं. आज देशात जी राजकीय परिस्थिती आहे, त्यातून देशाचे भले होणार नाही. ही यात्रा एक अध्यात्मिक यात्रा राहिली असे मला वाटतं. सत्य, अहिंसा आणि बंधुतेच्या आधारावर हा देश बनला. ही मूल्य आपण जपली पाहीजेत. भारत जोडो यात्रेने आपल्याला प्रेम आणि एकतेचा रस्ता दाखवला आहे, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले. तसेच या देशाला एक नवा आशेचा किरण दाखवला आहे. हा आशेचा किरणच देशाला एका नव्या वाटेवर घेऊन जाईल, असा विश्वास प्रियंका गांधी व्यक्त केला.
जम्मू आणि काश्मीरच्या जनतेला धन्यवाद
या देशाच्या संविधानासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात आदर आहे. जम्मू आणि काश्मीरच्या जनतेला धन्यवाद देऊ इच्छिते की, त्यांनी खुल्या मनाने भारत जोडो यात्रेचे स्वागत केले. जेव्हा माझा भाऊ काश्मीरकडे येत होता, तेव्हा माझ्या आईला आणि मला त्यांनी मेसेज केला. ते म्हणाले की, काश्मीरमध्ये जाताना मी आपल्या घरी जातोय असे वाटतेय. माझ्या घरातील लोक माझी वाट पाहतायत. त्यांची आणि माझी गळाभेट झाल्यानंतर मी घरातल्या लोकांना भेटलो असे वाटतेय, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले.
दरम्यान, याच भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचा कोणताही नेता माझ्यासारखा चार दिवस पायी प्रवास करू शकत नाही. जम्मू-काश्मीरचे लोक त्यांना फिरू देणार नाहीत, असे नाही. तर, भाजपचे लोक घाबरट आहेत, या शब्दांत राहुल गांधी यांनी निशाणा साधला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"