नवी दिल्ली - केंद्रातील मोदी सरकारने काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला खाली करण्यास सांगितले आहे. प्रियंका यांना 1 ऑगस्ट 2020 पर्यंत बंगला खाली करण्यासंबंधी नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यानंतर आता प्रियंका गांधी सरकारी बंगला सोडून खासगी निवासस्थानी जाणार आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाने त्यांना सरकारी बंगला सोडण्यासंबंधी दिलेल्या नोटीसमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा बंगला एका भाजपा नेत्याला मिळणार आहे.
भाजपाचे राष्ट्रीय प्रसारमाध्यम प्रमुख आणि राज्यसभा सदस्य अनिल बलूनी यांना हा बंगला मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. "प्रियंका गांधी यांचा बंगला हा आता अनिल बलूनी यांना देण्यात आला आहे. त्यांनी तशी विनंती केली होती. प्रियंका गांधी यांनी बंगला रिकामा केल्यानंतरच बलूनी यांना त्याचा ताबा देण्यात येईल" अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने दिली आहे. बलूनी यांनी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव हा बंगला देण्याची विनंती केली होती. त्यांच्यावर कॅन्सरवरील उपचार करण्यात आले आहेत. त्यानंतर आता बंगला दिला असल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"नातीने आजीचं नाक कापलं"; परेश रावल यांचा प्रियंका गांधींवर हल्लाबोल
काही दिवसांपूर्वी बंगल्यावरून बॉलिवूड अभिनेते आणि भाजपा नेते परेश रावल यांनी प्रियंका गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. नातीनं आजीचं नाक कापलं असं म्हणत त्यांनी प्रियंका गांधीवर टीकास्त्र सोडलं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी यासंबंधीत ट्विट केलं होतं. "मोफत मिळालेल्या बंगल्यात राहून नातीनं आजीचं नाक कापलं" असं म्हणत परेश रावल यांनी प्रियंका यांच्यावर जोरदार टीका केली. विशेष रक्षण गटाचे (एसपीजी) संरक्षण काढून घेण्यात आल्याच्या आधारे त्यांना सरकारी बंगला सोडण्यास सांगण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले आहे. 1 ऑगस्टपर्यंत सरकारी बंगला सोडावा, असेही नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
गृहमंत्रालयाने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये प्रियांका गांधी यांचे एसपीजी संरक्षण काढून घेतले होते. 1997 मध्ये एसजीपी संरक्षणामुळे त्यांना 35 लोधी एस्टेट स्थित सरकारी बंगला देण्यात आला होता. काँग्रेसने या नोटीसवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही; परंतु सूत्रांनुसार नोटीस मिळण्याच्या आधीपासून सरकारी बंगला सोडण्याचा त्या विचार करीत होत्या. त्या दिल्ली, गुरुग्राममध्ये खाजगी बंगल्यात राहतील किंवा मेहरोली येथील फार्म हाऊसमध्येही जाण्याची शक्यता आहे, असेही संकेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : परीक्षा पडली महागात; तब्बल 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
संतापजनक! मास्क न लावण्यावरून झाला वाद, भाजप नेत्याची पोलिसांना मारहाण