नवी दिल्ली : मनी लाँड्रींगप्रकरणी बुधवारी दुपारपासून रॉबर्ट वाड्रा यांची चौकशी करण्यात येत आहे. आजही त्यांना बोलावण्यात आले होते. दिवसभर चाललेली चौकशी रात्री 9.20 च्या सुमारास संपली असून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी त्यांना नेण्यासाठी आल्या होत्या. वाड्राना ईडीने पुरावे सादर करत 40 प्रश्न विचारल्याचे समजते.
रॉबर्ट वाड्रा यांची बुधवारी पाच तास चौकशी करण्यात आली होती. यानंतर आज पुन्हा त्यांना सकाळी 9 वाजता बोलावण्यात आले होते. आज सकाळी 9.20 च्या सुमारास वाड्रा यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली होती. यानंतर दुपारी जेवणासाठी थांबविण्यात आली होती. त्यानंतर सुरु केलेली चौकशी रात्री 9.15 वाजेपर्यंत सुरु होती. आज जवळपास 12 तास चौकशी करण्यात आली. बुधवारी 36 प्रश्न विचारण्यात आले होते.
दरम्यान, ईडी वड्रा यांच्या चौकशीची माहिती फोडत असल्याचा आरोप त्यांचे वकील केटीएस तुलसी यांनी केला. तसेच वड्रांविरोधात कोणतेही ठोस पुरावे त्यांच्याकडे नसल्याचा दावाही केला.