ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि समाजवादी पार्टीने आघाडी केली असून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी संयुक्तरित्या प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली. यातच आता कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक म्हणून ओळखल्या जाणा-या प्रियांका गांधी सुद्धा प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी 14 फेब्रुवारीपासून प्रचार सभेला सुरुवात करणार आहेत. या प्रचाराची सुरुवात अमेठी आणि रायबरेलीतून करणार आहेत. तर 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीदरम्यान प्रचार रॅली असून यावेळी आयोजित ठिकठिकाणच्या जाहीर सभेत त्या भाषण करणार आहेत. तसेच, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही आपल्या लोकसभा मतदारसंघातील रायबरेलीत 20 फेब्रुवारी रोजी प्रचार सभा घेणार आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रियांका गांधी यांच्यासह स्टार प्रचार म्हणून 40 जणांचा समावेश आहे.