लखनऊ :उत्तर प्रदेशमध्ये इतर पक्षांशी युती करण्याचे दरवाजे आम्ही बंद केलेले नाहीत. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी म्हणाल्या की, काँग्रेस पक्ष दुर्बल होईल असा कोणताही निर्णय आम्ही घेणार नाही. मात्र, कोणाशी युती करणार किंवा नाही याबद्दल इतक्या लवकर काही सांगणे योग्य होणार नाही. भाजपला पराभूत करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. आगामी काळातील स्थिती पाहूनच काँग्रेस आपली रणनीती ठरविणार आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षांच्या काळात काँग्रेसने उत्तर प्रदेशात खूप मेहनत घेऊन काम केले आहे. ग्रामपंचायतींच्या स्तरापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे विणले आहे. त्यामुळे काँग्रेस आता संपूर्ण ताकदीने निवडणुका लढवेल.
प्रियांका गांधी या राजकीय पर्यटक आहेत अशी टीका भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. त्याबद्दल प्रियांका गांधी म्हणाल्या की, मी उत्तर प्रदेशला वारंवार भेटी देत असते. मी व माझा भाऊ राहुल गांधी फारशा गांभीर्याने राजकारण करत नाही असा गैरसमज भाजप पसरवत असतो. मात्र, त्याकडे आम्ही अजिबात लक्ष देणार नाही. मी उत्तर प्रदेशकडे दुर्लक्ष करते असा खोडसाळ प्रचार भाजपकडून केला जातो. मात्र, गेल्या १८ महिन्यांत प्रत्येक महत्त्वाच्या प्रश्नावर काँग्रेसने आवाज उठविला आहे, हे नागरिकांना दिसून येईल.
भीती दूर करा
प्रियांका गांधी यांनी शनिवारी सांगितले की, काँग्रेस कार्यकर्त्यांना मनातले भय बाजूला सारून २०२२ साली होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांसाठी सज्ज व्हावे. त्यासाठी अहोरात्र काम करावे. नागरिकांच्या प्रश्नांवर २०१९ पासून काँग्रेसने रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे याची आठवणही त्यांनी करून दिली.