'या' राज्यासाठी प्रियांका गांधी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार?; अनेक नेत्यांनी केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 12:28 AM2020-07-03T00:28:25+5:302020-07-03T07:07:06+5:30
उत्तर प्रदेशसाठी नवी रणनीती : काँग्रेसमध्ये मंथन
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करण्याबाबत पक्ष विचार करत आहे. शहरी विकास मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी प्रियांका गांधी यांना नोटीस जारी करत सरकारी निवासस्थान रिकामे करण्यास सांगितले होते. त्यानंतर पक्षाने हा नवा विचार सुरू केला आहे.
शहरी विकास मंत्रालयाच्या नोटीसनंतर शिल्लक रक्कम भरुन संकेत दिले की, त्या आता लखनौमध्येच राहतील. अर्थात, त्यांचा हा विचार काही नवीन नाही. उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीस झाल्यानंतर त्यांनी हा विचार मांडला होता. पण, मुलीची बोर्डाची परीक्षा असल्याने त्यांनी हा विचार टाळला होता. सूत्रांनी सांगितले की, लखनौमध्ये राहण्याचा विचार प्रियांका गांधी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि रॉबर्ट वाड्रा यांच्याशी चर्चा करुनच घेतला आहे. मात्र, राहुल आणि सोनिया गांधी यांच्याकडून उत्तर मिळणे अद्याप बाकी आहे. शीला कौल यांच्या रिकाम्या घरात राहणे, असा विचार प्रियांका गांधी यांनी केलेला आहे.
काँग्रेसचे संसद सदस्य कार्ती चिदंबरम यांनी असे मत व्यक्त केले आहे की, प्रियांका गांधी यांनी या काळात लखनौमध्ये राहायला हवे. चिदंबरम यांनी अशीही मागणी केली आहे की, प्रियांका गांधी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पक्षाने आतापासूनच जाहीर करावे. याशिवाय, प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू, राज बब्बर यांच्यासह अनेक नेत्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांना असा आग्रह केला आहे की, पक्षाने याबाबत लवकर निर्णय घ्यावा. विशेष म्हणजे, प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशात योगी सरकारविरुद्ध संघर्ष करत आहेत. यामुळे भाजप तर त्रस्त आहेच. पण, बसपा नेत्या मायावती त्याहून अधिक त्रस्त आहेत. कारण, मायावती ज्या वोट बँकेच्या जिवावर जिंकत आलेल्या आहेत त्या वोट बँकेमध्ये प्रियांका गांधी फूट पाडू शकतात.