काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रियंका यांनी सांगितलं की, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या काळात एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले ना एमएसपी दिला गेला. काँग्रेसचे सरकार आल्यास केवळ एमएसपीची गॅरंटी देणार नाही तर शेतकऱ्यांना कर्जमाफीही दिली जाईल असं आश्वासन प्रियंका यांनी दिलं आहे.
देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असून, यावेळी प्रत्येक पक्ष आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी अनेक आश्वासनं देत आहे. असंच आश्वासन काँग्रेसने दिलं आहे, ज्यात म्हटलं आहे की, ते शेतकऱ्यांना एमएसपीची कायदेशीर गॅरंटी देणार आहे. पंजाब-हरियाणा सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचीही तीच मागणी आहे.
प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर आरोप केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "आज देशात दररोज 30 शेतकरी आत्महत्या करत आहेत. भाजपाच्या राजवटीत 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आणि उपकरणांवर जीएसटी वसूल केला जातो."
"10 वर्षांत ना शेतकऱ्यांना एमएसपी मिळाला ना त्यांचे उत्पन्न दुप्पट झाले. कर्जबाजारी शेतकऱ्यांचा एक पैसाही माफ झाला नाही, तर काही उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये माफ झाले. काँग्रेस सरकारमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल. कृषी उपकरणे जीएसटीमुक्त असतील."
"एमएसपीची कायदेशीर गॅरंटी असेल. पिकांच्या नुकसानीबाबत 30 दिवसांत नुकसान भरपाई दिली जाईल. नवीन आयात-निर्यात धोरण केले जाईल. काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे 72,000 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले होते. काँग्रेस पुन्हा येईल. एमएसपी, कर्जमाफी आणि चांगल्या उत्पन्नाच्या गॅरंटीसह समृद्धी येईल" असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.