नवी दिल्ली : प्रियंका गांधी-वाड्रा अखेर सक्रिय राजकारणात उतरल्या आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या बुधवारी प्रियंका गांधी यांना काँग्रेसचे सरचिटणीसपद देऊन त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान, प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला आगामी लोकसभा निवडणुकांत रोखण्यासाठी राहुल गांधी यांनी काढलेले हे प्रियंका गांधी नावाचे ब्रह्मास्त्र असल्याचे मानले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधी कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. तसेच, त्या काँग्रेसच्या कोणत्या कार्यालयातून पार्टीचे कामकाज पाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या चार फेब्रुवारीला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी लखनऊमधील पार्टी मुख्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पार्टी मुख्यालयात तयारी सुरु आहे.
असा अंदाज वर्तविण्यात येत आहे की, पूर्व उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढणार आहे. दुसरीकडे, असे सांगण्यात येते की, राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार आहेत. तर, राहुल गांधी छिंदवाडा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
याचबरोबर, अशी चर्चा आहे की, प्रियंका गांधी या इलाहाबाद येथील जवाहरलाल भवनमधील कार्यालयात असतील. एकेकाळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या कार्यालयात बसून पार्टीचे काम पाहात होत्या. याशिवाय, लखनऊमध्ये पार्टीचे नवीन मुख्यालय तयार करण्यात आले आहे. याठिकाणी सुद्धा प्रियंका गांधी यांच्या कार्यालयासाठी जागा आहे. त्यामुळे लखनऊ येथून प्रियंका गांधी पार्टीसाठी काम करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.