हिमाचलसाठी प्रियांका गांधी ‘संकटमोचक’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 12:06 PM2024-03-05T12:06:01+5:302024-03-05T12:06:43+5:30
मुकेश अग्निहोत्री आणि अनिरुद्ध सिंह हे वीरभद्र सिंह गटातील मानले जातात. हाच गट सातत्याने मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना बदलण्याची मागणी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव विक्रमादित्य सिंह यांनी बंडखोर सहा आमदारांची भेट घेतली होती.
आदेश रावल -
नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश सरकारमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष नेतृत्व सक्रिय दिसत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सोमवारी हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि कॅबिनेट मंत्री अनिरुद्ध सिंह यांची दिल्लीत भेट घेतली. हिमाचलसाठी प्रियांका गांधी ‘संकटमोचक’च्या भूमिकेत दिसत आहेत.
मुकेश अग्निहोत्री आणि अनिरुद्ध सिंह हे वीरभद्र सिंह गटातील मानले जातात. हाच गट सातत्याने मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना बदलण्याची मागणी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी वीरभद्र सिंह यांचे चिरंजीव विक्रमादित्य सिंह यांनी बंडखोर सहा आमदारांची भेट घेतली होती.
काय दिला संदेश
प्रियांका गांधी यांनी उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि अनिरुद्ध सिंह यांच्याशी चर्चा केली. नाराज आमदारांशी चर्चा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना बदलले जाईल. यावर विश्वास ठेवण्याचा संदेश त्या आमदारांना द्या, असेही सांगण्यात आले आहे.
या बैठकीला भाजपचे अनेक नेतेही उपस्थित होते. विक्रमादित्य सिंह आणि इतर अनेक आमदार अजूनही भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती काँग्रेस नेतृत्वाकडे आहे. हे सर्व आमदार विक्रमादित्य सिंह यांच्या गटातील असल्याचे सांगितले जाते.