"देश-विदेशात फिरण्यासाठी मोदी १६ हजार कोटींची विमानं घेतात, पण शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही"
By देवेश फडके | Published: February 15, 2021 04:05 PM2021-02-15T16:05:39+5:302021-02-15T16:07:47+5:30
उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे किसान महापंचयातीला संबोधित करताना काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
बिजनौर : उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे किसान महापंचयातीला संबोधित करताना काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोनवेळा देशवासीयांनी निवडून दिले. मात्र, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. त्यांनी वारंवार रोजगार, शेतकऱ्यांच्या मुद्दे उपस्थित केले. परंतु, त्यांच्या राज्यात यासंदर्भात काहीच होताना दिसत नाही, असा आरोप प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना केला. (priyanka gandhi criticised modi govt on farmers protest at bijnor kisan mahapanchayat)
उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापासूनच कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी प्रियंका गांधी मैदानात उतरल्या असून, त्या ठिकठिकाणी किसान महापंचायतीत सहभागी होऊन मोर्चा सांभाळत असल्याचे दिसत आहे. बिजनौर येथील महापंचायतमध्ये बोलताना त्या म्हणाल्या की, सन २०१७ पासून उसाचा दर वाढवण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांची देणी मोदी सरकारने दिली नाहीत. मोदी सरकार १६ हजार कोटी रुपयांची विमाने खरेदी करू शकतात. मात्र, शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत, असा दावा प्रियंका गांधी यांनी केला आहे.
Sometimes I think why people chose Modi ji twice. They might've done it as they had hopes & trust that he would work for them. A lot was said during 1st election. He spoke of farmers, unemployment & others in the 2nd. But what happened? Nothing: Priyanka GV, Congress in Bijnor pic.twitter.com/m4oSjROQFH
— ANI UP (@ANINewsUP) February 15, 2021
कृषी कायदे उद्योगपतींसाठी
उद्योगपतींचा फायदा होण्यासाठी केंद्रीय कृषी कायदे तयार करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे पीक घ्यायचे की नाही, हे आता उद्योगपती ठरवणार आहेत. उद्योगपतींचे भले करण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे. मात्र, शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकायला मोदी सरकारकडे वेळ नाही, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली.
दिशा रविला पाकिस्तानचा पाठिंबा; मोदी सरकारवर केली जोरदार टीका
शेतकऱ्यांच्या भेटीसाठी वेळ नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका, चीन आणि पाकिस्तानच्या दौऱ्यावर जातात. मात्र, दिल्ली सीमेवरील शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी जात नाहीत. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, परजीवी म्हणाले. पंतप्रधान मोदींना देशभक्त आणि देशद्रोही यातील अंतर समजले नाही, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले.
कृषी कायदे मागे घ्या
पंतप्रधान मोदी, तुम्ही सत्तेत आहात. शेतकऱ्यांचा आदर करा. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे कृषी कायदे मागे घ्या, या मागणीचा पुनरुच्चार प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना केला. मोदी सरकारच्या कार्यकाळात गरिबांचे, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. श्रीमंतांची संपत्ती मात्र दुप्पट झाली, असा दावा करत शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्यांविषयी सहवेदना प्रकट करून दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले.