नवी दिल्ली - नोबेल पुरस्कारविजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्यावर टीका करणारे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी टोला लगावला आहे. ऑटो सेक्टरमध्ये आलेल्या मंदीचा उल्लेख करत पीयूष गोयल यांना टोला लगावताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, सरकारचे काम अर्थव्यवस्था चालवण्याचे आहे. कॉमेडी सर्कस चालवण्याचे नाही. अभिजित बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करताना पीयूष गोयल म्हणाले होते की, ''अभिजित बॅनर्जी हे डाव्या विचारसरणीशी जवळीक असलेले अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी न्याय योजनेला जोरदार पाठिंबा दिला होता. मात्र जनतेने त्या योजनेला नकार दिला होता.'' त्याला प्रत्युत्तर देताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, भाजपा नेत्यांना जे काम मिळाले आहे ते पूर्ण करण्याऐवजी ते इतरांनी मिळवलेले यश नाकारण्यात गुंतले आहेत. नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्यांनी आपलं काम प्रामाणिकपणे करून नोबेल पुरस्कार जिंकला. अर्थव्यवस्था ढासळत आहे. अशा परिस्थितीत तुमचं काम अर्थव्यवस्था सावरण्याचं आहे, कॉमेडी सर्कस चालवण्याचं नाही.''
पीयूष गोयल यांनी नोबेल पुरस्कारविजेते अभिजित बॅनर्जी यांचं उपहासात्मक कौतुक करताना ते डाव्या विचारांचे अर्थशास्त्रज्ञ असल्याचे म्हटले होते. अभिजित बॅनर्जी यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. ते कुठल्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात, हे तुम्हाला माहितच असेल. ते डाव्या विचारसरणीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.