Haryana Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियांका वाड्रा-गांधी यांनी बुधवारी(2 ऑक्टोबर) हरियाणामध्ये पक्षाचा प्रचार केला. यावेळी त्यांनी 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेतून हद्दपार करण्याचे आवाहन केले. प्रियंका त्यांच्या पक्षाच्या उमेदवार आणि ऑलिम्पिक कुस्तीपटू विनेश फोगट यांच्या प्रचारासाठी जुलाना येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी रोजगार, अग्निवीर, शेतकरी कल्याण या मुद्द्यांवरुन राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक स्तरावर जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रियांका गांधींचा भाजपवर निशाणा प्रियांका गांधी आपल्या भाषणात म्हणाल्या की, कुरुक्षेत्राची लढाई आणि ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या लढाईसारखी संधी पुन्हा आली आहे. आजचा लढा अन्याय, असत्य आणि वाईटाच्या विरोधात आहे. तुम्हाला हा लढा लढावाच लागेल. हे सरकार मूठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहे. केंद्र सरकार रोजगार निर्मिती करू शकत नाही, कारण या सरकारने अंबानी-अदानींना सर्व काही दिले आहे.
प्रियांका पुढे म्हणतात, सर्व बंदरे, विमानतळ, जमिनी बड्या उद्योगपतींना दिल्या. शेतकऱ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकत नाहीत. अग्निपथ योजनेचा संदर्भ देत ते म्हणाले की, अग्निवीर जवानांना चार वर्षांच्या सेवेनंतर पुन्हा नोकरी शोधावी लागेल आणि त्यांना पेन्शनही मिळणार नाही. मोदीजींनी तुम्हाला हेच दिले आहे. 10 वर्षे तुमची दिशाभूल करण्यात आली. शेतकरी, सैनिक, पैलवान, महिला या सर्वांवर 10 वर्षांपासून अन्याय होत आहे. दिल्लीच्या सीमेवर बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मोदींनी 5 मिनिटेही येण्याची तसदी घेतली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.