...तर सरळ घरी चालते व्हा; धक्काबुक्की झाल्यामुळे प्रियांका गांधी संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 10:03 AM2018-04-13T10:03:47+5:302018-04-13T10:03:47+5:30
प्रियांका यांना एसपीजीची सुरक्षा असूनही गर्दी सुरक्षेचे कडे तोडून आतमध्ये शिरली.
नवी दिल्ली: कठुआ-उन्नाव बलात्कार घटनांच्या निषेधार्थ गुरूवारी मध्यरात्री काँग्रेस पक्षाकडून पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली इंडिया गेटपर्यंत मेणबत्ती मोर्चा (कँडल मार्च) काढण्यात आला. या मोर्चामध्ये काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राहुल यांची बहीण प्रियांका गांधी यादेखील मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी गर्दीतील लोकांच्या हुल्लडबाजीमुळे प्रियांका यांच्या संतापाचा पारा चढला. त्यांनी या लोकांना, 'गोंधळ घालायचा असले तर सरळ घरी चालते व्हा', अशा शब्दांत सुनावले.
मेणबत्ती मोर्चा इंडिया गेटजवळ पोहोचल्यानंतर हा प्रकार घडला. यावेळी पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवता आले नाही. अनेकजण प्रियांका गांधी यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडत होते. प्रियांका यांना एसपीजीची सुरक्षा असूनही गर्दी सुरक्षेचे कडे तोडून आतमध्ये शिरली. त्यामुळे प्रियांका यांना धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. या सगळ्यामुळे प्रियांका गांधी यांची लहान मुलगी खूप गांगरली आणि रडायला लागली. तेव्हा प्रियांका गांधी प्रचंड संतापल्या. त्यांनी धक्काबुक्की करणाऱ्या कार्यकर्त्यांना चांगलेच फैलावर घेतले. तुम्ही याठिकाणी कशासाठी आले आहात, याचे जरा भान बाळगा. आता प्रत्येकाने गप्प बसा. ज्यांना धक्काबुक्की करायचेय त्यांनी सरळ घरी चालते व्हा, असे प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.
सुरूवातीला कार्यकर्त्यांची गर्दी पाहून राहुल गांधींचा मेणबत्ती मोर्चा यशस्वी झाला, असे वाटल्यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंद पसरला. मात्र थोड्याच वेळात या मोर्चाचा फज्जा उडाला. कारण कार्यकर्ते आणि उपस्थित लोकांनी अत्यंत बेशिस्तपणे गर्दी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. आंदोलन सोडून लोक राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी गर्दी करु लागले. मोर्चा बाजूला राहिला आणि कार्यकर्त्यांना आवरताना राहुल गांधींच्या नाकीनऊ आले.