प्रियांका मैदानात अन् काँग्रेस-सपा आले एकत्र; काँग्रेस लोकसभेच्या १७ जागांवर उमेदवार उभे करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 06:41 AM2024-02-22T06:41:50+5:302024-02-22T06:42:48+5:30

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल, सपचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र चौधरी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी ही घोषणा केली.

Priyanka Gandhi ground and Congress-SP come together; Congress will field candidates on 17 Lok Sabha seats | प्रियांका मैदानात अन् काँग्रेस-सपा आले एकत्र; काँग्रेस लोकसभेच्या १७ जागांवर उमेदवार उभे करणार

प्रियांका मैदानात अन् काँग्रेस-सपा आले एकत्र; काँग्रेस लोकसभेच्या १७ जागांवर उमेदवार उभे करणार

आदेश रावल

लखनौ : समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यातील उत्तर प्रदेशमधील जागावाटपाचा अडथळा आता दूर झाला आहे. दोन्ही पक्षांनी बुधवारी राज्यात इंडिया आघाडीअंतर्गत जागावाटपाची औपचारिक घोषणा केली. या अंतर्गत राज्यातील ८० जागांपैकी काँग्रेस रायबरेली आणि अमेठीसह १७ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे.

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल, सपचे राष्ट्रीय सचिव राजेंद्र चौधरी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि काँग्रेसचे उत्तर प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी ही घोषणा केली. पांडे म्हणाले की, काँग्रेस १७ , तर राज्यातील उर्वरित ६३ जागांवर सप आणि इतर सहकारी पक्षांचे उमेदवार निवडणूक लढवतील. सपाने मध्य प्रदेशातील खजुराहो लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. ही मागणी काँग्रेसने मान्य केली आहे.

दिल्लीत मतभेद

दिल्लीतील सातपैकी चार जागांची मागणी करणाऱ्या काँग्रेसला ‘आप’शी आघाडीच करायची नसल्याचा आरोप आप करीत आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक केजरीवाल यांची आतापर्यंत काँग्रेसश्रेष्ठींशी जागावाटपावरून दोनदा चर्चा झाली असून, ती मार्गी लागणार असल्याचे वाटत असताना पुन्हा अडचणी निर्माण झाल्या आहेत.

काँग्रेस कुठून लढणार?

राबबरेली, अमेठी, कानपूर, फतेहपूर सिक्री, बासगाव, सहारनपूर, प्रयागराज, बनारस, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, सीतापूर, बाराबंकी, देवरिया, महाराजगंज.

कुणी बजावली महत्त्वाची भूमिका?

प्रियांका गांधी मंगळवारी रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर घरी पोहोचल्या तेव्हा त्यांनी अखिलेश यादव यांच्याशी फोनवर बोलून १७ जागांवर शिक्कामोर्तब केले. तर, उर्वरित दोन जागा बदलण्यास सांगितले. १९ रोजी सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांची यादी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवली होती. त्यानंतर खरगे यांनी अखिलेश यांना सांगितले होते की, राहुल गांधी यांना मुरादाबाद आणि बिजनौर या दोन जागा हव्या आहेत. त्यानंतर अखिलेश यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखिलेश यांनी भारत जोडो न्याय यात्रेतही सहभाग घेतला नाही. अखेर प्रियांका गांधी यांनी अखिलेश यांच्याशी बोलून या आघाडीवर शिक्कामोर्तब केले.

Web Title: Priyanka Gandhi ground and Congress-SP come together; Congress will field candidates on 17 Lok Sabha seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.